Join us  

पिच फिक्सिंगमध्ये सहभागी असणा-यांविरोधात कठोर कारवाई करु - एमसीए अध्यक्ष

पुण्यात पिच फिक्सिंगमध्ये जे सहभागी आहेत किंवा ज्यांनी खेळपट्टीशी छेडछाड केलीय त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करु असे महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:30 AM

Open in App

मुंबई - पुण्यात पिच फिक्सिंगमध्ये जे सहभागी आहेत किंवा ज्यांनी खेळपट्टीशी छेडछाड केलीय त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करु असे महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पुण्यात दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. मात्र या सामन्याच्या काही तास आधी पीच फिक्सिंग संबंधी धक्कादायक खुलासा झाला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर बुकिंच्या मागणीनुसार पीच बनवून देत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. या स्टिंगमुळे आज होणा-या दुस-या एकदिवसीय सामन्याबद्दल अनिश्चिचतता निर्माण झाली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टरने बुकी असल्याचे भासवून पाडुंरंग साळगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी साळगावकर यांनी रिपोर्टरच्या मागणीनुसार पिच बनवून देण्याची तयारी दाखवली. 

आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करु. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करु असे स्टेडियमकडे निघालेल्या आपटे यांनी सांगितले. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या काहीतास आधी हा धक्कादायक खुलासा झाल्यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

रिपोर्टरने साळगावकर यांना दोन क्रिकेटपटूंना खेळपट्टीवर बाऊंस हवा आहे हे होऊ शकते का ? असा प्रश्न केला. त्यावर साळगावकर यांनी निश्चित तशी खेळपट्टी मिळेल असे उत्तर दिले. 337 धावांचा यशस्वी पाठलागही करता येऊ शकतो असे साळगावकर ऑन कॅमेरा बोलले. साळगावकर यांनी त्या रिपोर्टरला खेळपट्टीची पाहणी करण्याचीही परवानगी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे हे थेट उल्लंघन आहे. 

 

टॅग्स :क्रिकेटपांडुरंग गाळगावकर