Join us  

T20 World Cup: शाहिनच्या कामगिरीवरून सासरेबुवा शाहिद आफ्रिदी भडकले; होणाऱ्या जावईबापूंना सुनावले

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडनं शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ठोकले तीन षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 9:31 PM

Open in App

दुबई: उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानं पाकिस्तानचं टी-२० विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध विजय अक्षरश: खेचून आणला. शाहिनन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर लागोपाठ तीन षटकार ठोकत मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध होईल.

वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं पाकिस्तानकडून १९ वं षटक टाकलं. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला. त्यानंतरच्या पुढच्या तीन चेंडूंवर वेडनं षटकार ठोकत १८ धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियानं ५ गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. शाहिन आफ्रिदीच्या या कामगिरीबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं नाराजी व्यक्त केली. शाहिनच्या गोलंदाजीवर तीन षटकार जायला नको होते, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. शाहिन हा शाहिद आफ्रिदीचा होणारा जावई आहे.

'शाहिनच्या कामगिरीवर मी खूष नाही. हसन अलीनं झेल सोडला म्हणून तुम्ही उरलेल्या षटकात षटकार देऊन टाकायचे असं होत नाही. त्याच्याकडे वेग आहे आणि त्यानं ऑफ स्टम्पच्या बाहेर यॉर्कर टाकायला हवे होते. मात्र वेडला ज्या चेंडूंवर फटकेबाजी करता येईल, अशाच ठिकाणी त्यानं चेंडू टाकले,' असं शाहिद आफ्रिदीनं म्हटलं.

शाहिन आफ्रिदी २१ वर्षांचा असून तो पाकिस्तानकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये खेळतो. शाहिन लवकरच पाकिस्तानचा दिग्गज ऑल राऊंडर शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा यांचा निकाह ठरला आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१शाहिद अफ्रिदी
Open in App