Join us  

टी१० मुळे क्रिकेटला ऑलिम्पिकसाठी मदत होईल- इयॉन मॉर्गन

सलग दोन विश्वचषक जिंकण्याची इंग्लंडला नामी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:24 AM

Open in App

- रोहित नाईक मुंबई : ‘टी१० मुळे क्रिकेटचे स्वरूप कमी होत आहे, असे मी म्हणणार नाही. मी याआधीही दोन सत्र टी१० खेळलो आहे. खेळाच्या या लहान स्वरूपामुळे क्रिकेटची उत्सुकता आणि रोमांचकता वाढत असून या माध्यमातून क्रिकेटचा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश होण्यास मदत मिळेल,’ असे इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्येकी १० षटकांचा सामना खेळविण्यात येणाऱ्या टी१० लीगला १४ नोव्हेंबरपासून अबुधाबी येथे सुरुवात होईल. या लीगची घोषणा सोमवारी मुंबईत करण्यात आली. या वेळी मॉर्गनने ‘लोकमत’शी संवाद साधला. मॉर्गन म्हणाला, ‘मी गेली दोन सत्रे ही स्पर्धा खेळलो असून क्रिकेटप्रेमींमध्येही टी१० प्रकार लोकप्रिय होत आहे. टी२० अल्पावधीत जगभरात लोकप्रिय झाले आणि टी१० त्यापुढचे पाऊल आहे. शिवाय या छोट्या स्वरूपाच्या माध्यमातून क्रिकेटचा ऑलिम्पिक व राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही समावेश होण्यास मदत होईल. याद्वारे ८-१० संघ ऑलिम्पिक व राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या १२-१३ दिवसांमध्ये पदकांसाठी खेळू शकतील.’ टी१० लीगच्या पहिल्या दोन सत्रांसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.इंग्लंडने यंदा घरच्या मैदानावर ५० षटकांचा आयसीसी विश्वचषक उंचावला. या क्षणाविषयी मॉर्गन म्हणाला, ‘नक्कीच या विजयाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत होतो. गेल्या ४ वर्षांपासून या सर्वोत्तम विजयासाठी आम्ही संघ बांधणी करत होतो आणि अंतिम सामन्यातील नाट्यमय विजयासह आमची मेहनत यशस्वी झाली. हा प्रवास अप्रतिम होता.’ आता पुढील लक्ष्य आगामी टी२० विश्वचषक असल्याचेही मॉर्गन म्हणाला. यंदाचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकलेला असल्याने पाठोपाठ टी२० विश्चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी इंग्लंड संघाकडे आहे.मॉर्गन म्हणाला की, ‘पुढच्या वर्षी होणाºया टी२० विश्वचषकाआधी आम्ही १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार आहोत आणि त्यातून आम्हाला संघ उभा करण्यास पुरेसा वेळ मिळेल. आयसीसी विश्वचषक विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास आम्हाला फायदेशीर ठरेल. प्रत्येक खेळाडूला संघाची बलस्थाने माहीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे संघातील सर्व खेळाडूंचे लक्ष पुढील वर्षी होणाºया टी२० विश्वचषकाकडे लागले आहे. ५० षटकांच्या विश्वचषकाची ज्याप्रकारे तयारी केली होती, तशीच तयारी टी२० विश्वचषकासाठी सुरू आहे.’