शारजा, टी-10 लीग : पंजाबी लिजंड्स संघाने टी-१० लीगमध्ये गुरुवारी पखतून्सवर पाच विकेट राखून विजय मिळवला. पखतून्सचे १०३ धावांचे लक्ष्य लिजंड्सने ८.५ षटकांत पूर्ण केले.
पंजाबी लिजंड्सच्या गोलंदाजांनी पखतून्सच्या धावांवर अंकुश लावला. आंद्रे फ्लेचर ( 28) आणि कर्णधार कॉलिन इंग्राम (29) वगळता पखतून्सच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. हसन खानने सर्वाधिक चार विकेट घेत पखतून्सला जबर धक्का दिला. त्याने दोन षटकांत 22 धावा देत 4 विकेट घेतल्या. प्रविण कुमारने 21 धावांत 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. हसनने नवव्या षटकात तीन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मूरेस आणि उमर अकमल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र मधल्या फळीने कच खाल्याने लिजंड्सचा विजय अवघड बनला. मूरेसने १९ धावा केल्या. अकमलने २१ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ४१ धावा केल्या. तळाला ई लुइसने झटपट नाबाद २० धावा करताना लिजंड्सचा विजय पक्का केला.