ठळक मुद्देवॉरियर्सने अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय पक्का केला. 92 धावांचा पाठलाग करताना गमावले 9 गडीअखेरच्या षटकात तीन फलंदाज माघारी फिरल्याने चुरस
शारजा, टी-10 लीग : कर्णधार शेन वॉटसनच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर सिंधीस संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात नॉर्दन वॉरियर्सची सुरुवार दमदार झाली. मात्र, थोड्या थोड्या अंतराने फलंदाज माघारी फिरल्याने त्यांना अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची गरज असताना वॉरियर्सचे तीन फलंदाज माघारी पाठवून सिंधीसने सामन्याला नाट्यमय वळन दिले, परंतु वॉरियर्सने अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय पक्का केला.
नॉर्दन वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून सिंधीस संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत वॉरियर्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. वॉटसनने 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावांची खेळी साकारली. वॉटसनच्या अर्धशतकानंतरही सिंधीस संघाला शतकाची वेस ओलांडता आली नाही. कारण वॉटसनला संघातील अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. वॉरियर्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण त्यांना वॉटसनला झटपट बाद करण्यात अपयश आले. वॉरियर्सकडून आंद्रे रसेल, हॅरी गुर्नी आणि हार्डस व्हिलजॉइन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात लेंडल सिमन्स आणि निकोलस पुरण यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, हे दोघे माघारी फिरल्यानंतर वॉरियर्सचा डाव गडगडला. अखेरच्या षटकात इसुरू उदानाने तीन विकेट घेत वॉरियर्सचा विजयाच्या मार्गात अडथळा निर्माण केला. मात्र, अखेरच्या चेंडूवर वॉरियर्सच्या फलंदाजांनी लेगबायवर एक धाव घेत विजय निश्चित केला.