ठळक मुद्देशहजाद अहमदच्या विकेटनंतर रजपूतचा संघ सावरलामॅकलमची आतषबाजी, रजपूतच्या 3 बाद 121 धावा
शारजा, टी-10 लीग : ब्रेंडन मॅकलमच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर रजपूत संघाने टी-10 लीगमध्ये शुक्रवारी पखतून्स संघासमोर 122 धावांचे लक्ष्य ठेवले. पखतून्सकडून शाहिद आफ्रिदीने प्रभावी मारा करताना दोन षटकांत 11 धावा देत एक विकेट घेतली. त्याला अन्य गोलंदाजांनीही तोलामोलाची साथ दिली.
सलामीच्या सामन्यात अवघ्या चार षटकांत विजय मिळवणाऱ्या रजपूत संघाला दुसऱ्या सामन्यात संघर्ष करावा लागला. सिंधीसविरुद्धच्या सामन्यात 16 चेंडूत 74 धावा चोपण्यारा मोहम्मद शहजाद शुक्रवारी पखतून्स संघाविरुद्ध पहिल्याच षटकात माघारी परतला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, रिली रोशोव आणि कर्णधार ब्रेंडन मॅकलम यांनी रजपूतचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. रोशोवने 7 चेंडूंत 4 खणखणीत षटकार खेचून 25 धावा चोपल्या. पखतून्सच्या शाहिद आफ्रिदीने पहिल्याच षटकात रोशोवचा अडथळा दूर केला. आफ्रिदीने उत्तम गोलंदाजी करताना दोन षटकांत केवळ 11 धावा दिल्या.
दुसरीकडे मात्र मॅकलमने फटकेबाजी कायम राखताना अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत दोन चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात मॅकलम बाद झाला. त्याने 29 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 58 धावा केल्या. लॉरी इव्हान्सने त्याला चांगली साथ दिली. इव्हान्सने 7 चेंडूंत 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. रजपूत संघाने 10 षटकांत 3 बाद 121 धावा केल्या.