शारजा, टी-10 लीग : पखतून्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यातील टी-10 लीगमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शाहिद आफ्रिदीची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पखतून्सने 5 बाद 135 धावा उभ्या केल्या.
नॉर्दर्न वॉरियर्सने नाणेफेक जिंकून पखतून्स संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. या सामन्यात टी-10 लीगमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या आंद्रे फ्लेचर आणि निकोलस पूरण या दोन फलंदाजांच्या फटकेबाजीचा आस्वाद लुटण्याची अपेक्षा होती. मात्र, पखतून्सचा फ्लेचर अवघ्या 14 धावांवर माघारी परतला. पखतून्सचे चार फलंदाज 57 धावांवर तंबूत परतले होते. त्यामुळे ते मोठी मजल मारू शकत नाही, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला.
हार्डस विलजोइनने दोन षटकांत 26 धावा देत पखतून्सच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवले. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार आफ्रिदीने षटकारांची आतषबाजीच केली. त्याने अवघ्या 14 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात सहा षटकारांचाच समावेश होता.
त्याच्या या खेळीने पखतून्सने 10 षटकांत 135 धावांचा डोंगर उभा केला. आफ्रिदीने 17 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 59 धावा कुटल्या.