Join us  

Video : रिषभ पंतचा अपयशाचा पाढा कायम; विचित्र फटका मारण्याच्या नादात दांडी गुल

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या डे नाइट कसोटी सामन्यात बाकावर बसलेल्या रिषभ पंतला फॉर्म मिळवण्यासाठी टीम इंडियानं रिलीज केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:01 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या डे नाइट कसोटी सामन्यात बाकावर बसलेल्या रिषभ पंतला फॉर्म मिळवण्यासाठी टीम इंडियानं रिलीज केलं. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा उत्तराधिकारी म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. मात्र, त्याला साजेशी कामगिरी करण्यात सातत्यानं अपयश येत आहे. तरीही संघ व्यवस्थापन त्याला सातत्यानं संधी देत आहेत. रिषभला फॉर्ममध्ये परत येण्यासाठी व्यवस्थापनानं त्याला सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळेच त्याला इडन गार्डन कसोटीतून रिलीज केले. पण, येथेही त्याचा अपयशाचा पाढा कायम राहिला आणि एक विचित्र फटका मारताना त्याची दांडी गुल झालेली पाहायला मिळाले.

दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना रिषभला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दिल्ली आणि हरयाणा या सामन्यात दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. हरयाणा संघानं या सामन्यात दिल्लीवर कुरघोडी केली. दिल्लीच्या या अपयशाला रिषभचा खराब फॉर्म हा कारणीभूत ठरला. प्रथम फलंदाजी करताना हरयाणा संघानं 6 बाद 181 धावा केल्या. शिवम चौहान आणि हिमांशू राणा यांनी दमदार खेळ केला. शिवमनं 31 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 47 धावा केल्या. हिमांशूनं 40 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 59 धावा चोपल्या. दिल्लीकडून सिमरजीत सिंगनं 43 धावांत 2 फलंदाज बाद केले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना हितेश दलाल व रिषभ सलामीला आले. हितेश 1 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रिषभ आणि कर्णधार ध्रुव शोरेय यांनी डाव सावरला. पण, ध्रुव 23 धावांवर माघारी परतला. त्यानंतर दिल्लीची पडझड सुरू झाली. रिषभही 32 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार मारून 28 धावांत तंबूत परतला. संघाला जेव्हा खरी गरज असताना रिषभ विचित्र फटका मारण्यासाठी गेला आणि त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. दिल्लीकडून नितीश राणा ( 37) आणि सुबोथ भाटी ( 26) यांनी संघर्ष केला. पण, त्यांना 8 बाद 151 धावाच करता आल्या. हरयाणानं हा सामना 30 धावांनी जिंकला, परंतु या पराभवानं दिल्लीच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा धुसर केल्या. 

पाहा व्हिडीओ ( 3.25 मिनिटांपासून पुढे) 

 

 

टॅग्स :रिषभ पंतबीसीसीआयदिल्लीहरयाणा