Join us  

Suresh Raina Retirement: ... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला

Suresh Raina Retirement: निवृत्तीसाठी दोघांनी 15 ऑगस्टच का निवडले? सुरेश रैनानं त्या चर्चांना दिला दुजोरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:10 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी सायंकाली 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. हा धक्का पचेपर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुरेश रैनाच्या रुपानं दुसरा धक्का बसला. धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर दोघांवर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा पाऊस पडला. पण, निवृत्तीसाठी दोघांनी 15 ऑगस्टच का निवडले? 

भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा 

मला माहित्येय तुला रडावासं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला.  धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

रैनानं 2018मध्ये अखेरचा वन डे  व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की,''धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळाच होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद.'' रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.  

दरम्यान, या दोघांनी 15 ऑगस्टच का निवडले, यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. संपूर्ण देश भारत स्वातंत्र्य होऊन 73 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना क्रिकेट चाहत्यांसाठी नाराज करणारे वृत्त समोर आले. भारताच्या माजी कर्णधार धोनीचं जर्सी क्रमांक 7 आहे आणि रैनाच्या जर्सीचा क्रमांक 3 आहे. ही दोघं एकत्र आली की 73 असा आकडा तयार होतो आणि त्यामुळे या दोघांनी 15 ऑगस्टची निवड केली, असं एक ट्विट व्हायरल झालं. मुख्य बाब म्हणजे सुरेश रैनानंही त्यावर कमेंट करून वृत्ताला दुजोरा दिला. 

टॅग्स :सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीस्वातंत्र्य दिन