उत्तर प्रदेश : भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना याचे वर्ल्ड कप संघातील पुनरागमनाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मात्र, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धुमाकूळ घालण्यासाठी रैना सज्ज आहे आणि त्याने त्याची झलक सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात दाखवून दिली. उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना मागील आठवड्यात 35 चेंडूंत 54 धावा करणाऱ्या रैनाने रविवारी 12 धावांची खेळी करताना एका भीमकाय पराक्रमाला गवसणी घातली. पुदुच्चेरीविरुद्धचा सामना हा त्याचा 300 वा ट्वेंटी-20 सामना ठरला. पण, यापेक्षा मोठी आणि कोणत्याही भारतीय खेळाडूला सर करता न आलेला यशोशिखर त्याने पादाक्रांत केला.
मागील आठवड्यात त्याने 35 चेंडूंत नाबाद 54 धावा करताना उत्तर प्रदेश संघाला सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 मालिकेत इ गटात हैदराबादविरुद्ध सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. रैनाने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने ट्वेंटी-20 क्रिकेट कारकिर्दीत 300 षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. सिक्सर किंग रोहित शर्मा याच्यानंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 300 षटकार खेचणारा रैना दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (
आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रैनाने रविवारी मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत पुदुच्चेरीविरुद्ध अवघ्या 12 धावा केल्या. उत्तर प्रदेशने हा सामना 77 धावांनी जिंकला. उत्तर प्रदेशच्या 4 बाद 179 धावांचा पाठलाग करताना पुदुच्चेरीला 6 बाद 102 धावाच करता आल्या. या सामन्यात रैनाने महेंद्रसिंग धोनीच्या 300 ट्वेंटी-20 सामने खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
पण, या सामन्यात 11 वी धाव घेताच रैनाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला सर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा तो जगातील सहावा आणि भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रैनाने 300 ट्वेंटी-20 सामन्यांत 33.47 च्या सरासरीनं आणि 139च्या स्ट्राईक रेटनं 8001 धावा केल्या आहेत. नाबाद 126 ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याच्या नावावर चार शतकं व 48 अर्धशतकं जमा आहेत. त्याच्या या खेळीत 715 चौकार व 302 षटकार आहेत आणि 157 झेल त्यानं टिपले आहेत.