नवी दिल्ली : उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर सर्वच संघांची धडकी भरविणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळायचे असून हा सामना जिंकून ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याचा त्यांचा इरादा आहे.
टी-२० हा फलंदाजांचा खेळ मानला जात असला तरी हैैदराबादच्या गोलंदाजांनी लहान लहान धावसंख्येचा बचाव करीत दिग्गजांना नमविले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील या संघाने दहा पैकी आठ सामने जिंकून तालिकेत अव्वल स्थान घेतले. दुसरीकडे दहा सामन्यात दिल्लीचे केवळ सहा गुण आहेत. कर्णधार आणि मैदान बदलले तरी त्यांचे भाग्य बदललेले नाही. गुरुवारी हा संघ पराभूत झाल्यास स्पर्धेची दारे बंद होतील.
हैदराबादमध्ये झालेल्या मागच्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा सात गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फ्लॉप ठरले होते. दिल्लीची समस्या त्यांची फलंदाजी आहे. एकाचवेळी सर्व फलंदाज ‘क्लीक’ होत नसल्याने हैदराबादचा भेदक मारा ते कसे खेळतील हा प्रश्न आहे.
ऋषभ पंत आणि अय्यर यांनी धावा काढल्या पण गौतम गंभीर खराब फॉर्ममध्ये स्वत: बाहेर झाला. विदेशी खेळाडू कोलिन मुन्रो, जेसन रे, ख्रिस मॉरिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील प्रभावी ठरले नाहीत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याने दहा सामन्यात १३ गडी बाद केले खरे पण दुसºया टोकाहून त्याला साथ लाभली नाही. (वृत्तसंस्था)
सनरायझर्सने मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा पाच धावांनी पराभव केला. भुवनेश्वर कुमार हा त्यांच्यासाठी मॅचविनर सिद्ध झाला आहे. सिद्धार्थ कौल हा देखील चार षटकांत कमी धावा देत प्रतिस्पर्धी संघाला कोंडीत पकडत आहे. कौल आणि अफगाणिस्तानचा राशीद खान यांनी दहा सामन्यात प्रत्येकी १३ गडी बाद केले. बांगला देशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने दहा बळी घेतले आहेत. अंबाती रायुडू आणि विलियम्सन हे आॅरेंज कॅपच्या दौडीत पहिल्या आणि दुस-या स्थानावर आहेत.
दिल्लीला आता उर्वरित चारही सामने फिरोजशाह कोटलावर खेळायचे असून अय्यर आणि सहकाºयांकडून मोठ्या चमत्काराची दिल्लीकरांचा अपेक्षा असेल. सनरायझर्सचा डोळा मात्र प्ले आॅफवरच असेल.
वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : फिरोझशहा कोटला स्टेडियम, नवी दिल्ली