हैदराबाद - अस्तित्व कायम राखण्यासाठी धडपडणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी सनरायझर्स हैदराबादच्या भेदक मा-याचे आव्हान असेल. दिल्लीवर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट आहे. नऊ सामन्यात तीन विजयासह त्यांनी सहावे स्थान मिळवले आहे. पाच सामने अद्याप शिल्लक असून सर्वच सामने त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ असेच असतील.
गंभीरच्या नेतृत्वात अनेक सामने गमविल्यानंतर संघाचे नेतृत्व युवा श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले. दिल्लीने गत सामन्यात राजस्थानला पराभूत केले. युवा पृथ्वी शॉ, कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत यांनी जोरदार फलंदाजी केली. कॉलिन मुन्रो आणि मॅक्सवेल यांनी मात्र घोर निराशा केली. ट्रेंट बोल्ट याने १३ बळी घेतले. सनरायजर्सने आठपैकी सहा सामने जिंकून १२ गुण घेतले. कमी धावा नोंदविल्यानंतरही गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकणारा हैदराबाद एकमेव संघ आहे. सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, बासिल थम्पी, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि युसूफ पठाण हे गोलंदाजीत कमाल करीत आहेत. मागच्या सामन्यात हैदराबादने पंजाबला १९.२ षटकांत ११९ धावांत गारद केले. त्याआधी २९ एप्रिल रोजी राजस्थानला त्यांनी १४० धावांत रोखले होते.
भुवनेश्वरच्या अनुपस्थितीतही हैदराबादची कामगिरी सरस ठरली, हे विशेष. दिल्लीविरुद्ध भुवी खेळावा, अशी कर्णधार केन विलियम्सनची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)
वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
फलंदाजीत विलियम्सनसह मनीष पांडे, रिद्धिमान साहा, दीपक हुड्डा आणि युसूफ पठाण यांच्यावर भिस्त असेल. मुख्य कोच टॉम मूडी यांनी तिन्ही विभागांत मोक्याच्याक्षणी आमचे खेळाडू चमकतील, असे संकेत दिले.