अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
आयपीएल आता अर्ध्यावर आली असून स्पर्धा अजून अटीतटीची झाली आहे. तसेच यंदाच्या सत्रात आॅरेंज आणि पर्पल कॅकवर कब्जा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातत्याने बदल दिसून येत आहे. सध्या आॅरेंज कॅप अंबाती रायुडूकडे आहे.
गेले काही वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणाºया रायुडूने यंदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे.
रायुडूने प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावली आहे. विशेष म्हणजे त्याने केवळ वेगाने धावा काढल्या नसून संघाला विजयी करण्यात मोलाचे योगदानही दिले आहे. त्याच्याच कामगिरीमुळे चेन्नईने गुणतालिकेत चांगली कामगिरी साधली आहे. त्याशिवाय महेंद्रसिंह धोनीचे एक कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही संघाच्या वाटचालीत मोठे योगदान राहिले आहे. तसेच द्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन या अष्टपैलू खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे.
दखल घेण्याची बाब म्हणजे अनेकांना चेन्नईचा संघ ‘ओल्ड एज होम’ वाटत होते. कारण रायुडू, धोनी, वॉटसन, ब्राव्हो, सुरेश रैना आणि इम्रान ताहिर हे सर्व प्रमुख खेळाडू तिशीपार केलेले आहेत. त्यात त्यांचे तीन - चार खेळाडू पस्तीशीच्या पुढचे आहेत. पण हाच अनुभव चेन्नईसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. कारण चेन्नईने अनेक सामने अखेरच्या षटकात जिंकले आहेत.
दुसरीकडे, पर्पल कॅपवर सध्या सिद्धार्थ कौलने कब्जा केला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजाने अपेक्षेप्रमाणे पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. कारण, ज्या प्रकारे हैदराबादने सातत्याने माफक धावसंख्येचे यशस्वी बचाव केले आहेत, ते अप्रतिम होते. मुंबईविरुद्ध ११८, त्यानंतर एका सामन्यात १३२ धावा, तर त्यानंतर १५१ धावांचेही त्यांनी यशस्वी संरक्षण केले होते. याचे कारण म्हणजे हैदराबादची गोलंदाजी मजबूत असून त्यात खूप विविधताही आहे. राशिद खान, शाकिब अल हसन या शानदार फिरकीपटूंसह संदीप शर्मा,
बासील थम्पी आणि सिद्धार्थ कौल
हे वेगवान गोलंदाज जबरदस्त
मारा करीत आहेत. खासकरून डेथ ओव्हर्समध्ये हैदराबादचे गोलंदाज निर्णायक मारा करीत आहेत.
विशेष म्हणजे त्यांचे दोन मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि बिली स्टेनलेक हे दोघेही दुखापतग्रस्त असून संघाबाहेर आहेत. त्यानंतरही इतर गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून देत आहेत. विशेष म्हणजे यानंतरही पर्पल
कॅप हैदराबादचा गोलंदाज मिळवतो
हे कौतुकास्पद आहे. यावरूनच
त्यांची संघनिवड किती अचूक आहे हे कळते.