मुंबई : भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्टÑीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) बुधवारी ही घोषणा केली. त्याचबरोबर या पाच सदस्यीय समितीमध्ये माजी जलदगती गोलंदाज हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
मदनलाल, सुलक्षणा नाईक आणि आर. पी. सिंग यांचा समावेश असणाऱ्या सीएसीने जोशी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सीएसी या निवडीचा एक वर्षानंतर आढावा घेऊन त्यांच्या कामाची समिक्षा करेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘सीएसीने राष्टÑीय निवड समितीचे प्रमुख म्हणून सुनील जोशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. सीएसी एक वर्षानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेऊन नव्याने शिफारस करेल. समितीमध्ये गगन खोडाच्या जागेवर हरविंदर यांना निवडले आहे.
निवड समितीमध्ये जतीन परांजपे (पश्चिम विभाग), शरणदीप सिंग (उत्तर), देवांग गांधी (पूर्व) हे सदस्य पुर्वीपासूनच आहेत. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. मदनलाल म्हणाले, ‘आम्ही या कामासाठी सर्वोत्कृष्ठ उमेदवाराची निवड केली आहे. त्यांच्या विचारामध्ये स्पष्टता होती म्हणून जोशी यांची आम्ही निवड केली आहे. ’ यापुर्वी सीएसीला या दोन पदांसाठी ४० अर्ज आले होते. यात जोशी व हरविंदर यांच्याव्यतिरिक्त व्यंकटेश प्रसाद, राजेश चौहान, लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.
जोशी यांना दक्षिण व हरविंदर यांना मध्य विभागासाठी निवड केल्यामुळे बीसीसीआयची सध्याची विभागीय पद्धती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमएसके प्रसाद व गगन खोडा यांना २०१५ मध्ये निवड समितीमध्ये स्थान मिळाले होते. नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. (वृत्तसंस्था)
>जोशी-हरविंदर यांची कामगिरी
कर्नाटकच्या जोशी यांनी भारताकडून १९९६ ते २००१ दरम्यान १५ कसोटी व ६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी ४१, तर एकदिवसीय सामन्यात ६९ बळी घेतले आहेत. जोशी यांनी कसोटीत ९२, तर एकदिवसीय सामन्यात नाबाद ६१ ही सर्वोच्च खेळी केली होती.
याशिवाय त्यांनी १६० प्रथम श्रेणी व लिस्ट ए मध्ये १६३ सामने खेळलेत. हरविंदर सिंग यांनी तीन कसोटी व १६ एकदिवसीय सामन्यांतून अनुक्रमे ४ व २४ बळी मिळवले.