Join us  

अमेरिकेत वाजतोय मराठी कन्येचा डंका; क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरीनं जिंकली सगळ्यांची मनं

प्रथम वर्षात शिकत असलेल्या १८ वर्षीय गार्गीचा लहानपणापासूनच साँकर (फुटबॉल) खेळ हा जीव की प्राण होता. त्यापलिकडे तिच्यासाठी दुसरे काही विश्वच नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 1:37 PM

Open in App

मनोहर कुंभेजकर

मुंबई-अंधेरी पश्चिम डीएन नगर येथे राहणारी आणि चिपी विमानतळाजवळील मालवण - मसुरे गावाशी नाळ जोडलेली असलेल्या 'गार्गी चंद्रकांत भोगले' चा जन्म मुंबई - अंधेरीत झाला. फायनान्स क्षेत्रात काम करणारे वडील व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या आई बरोबर ती सहा महिन्यांची असतानाच अमेरिकेत स्थलांतरित झाली.परदेशातही मराठी पाऊल पडती पुढे या उक्तीप्रमाणे अंधेरीची ही तरुणी अमेरिकेत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उज्वल करत आहे. ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळ सुरू झाले.त्यामुळे अमेरिका-मुंबई-चिपी असा विमान प्रवास करून आपल्या मालवण- मसुरे गावाला लवकर यायची तिची इच्छा आहे.

२०१८ साली फ्लॉरिडा येथे झालेल्या जीसीएल (गर्ल्स क्रिकेट लिग) स्पर्धेत गार्गीने खेळलेल्या ३ सामन्यांतून एकुण ११६ धावा काढल्या आणि त्या स्पर्धेतील सर्वाधिक रन्स काढणारी फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. पुढे अमेरिका महिला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत, पश्चिम विभागाकडून खेळताना तिने त्या स्पर्धेत 'प्लेयर आँफ द टूर्नामेंट' होण्याचा कौतुकास्पद पराक्रम केला. या महिन्यात मेक्सिको येथे चार (अमेरिका, अर्जेंटीना, ब्राझील, कॅनडा ) देशांमध्ये वर्ल्डकप क्वाँलिफायर्ससाठी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत ती अमेरिका संघातून 'ओपनिंग बॅट्समन' म्हणुन खेळणार आहे. खेळातील तिच्या प्रगतीचा आलेख बघता, ती ही स्पर्धा गाजवणार, धावांचा पाऊस पाडणार, यात शंकाच नाही. तेथील क्रिकेट शौकीनांमध्ये सोशल मिडीयावर होणार्या चर्चेत सध्या, अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यातील रँन्चो सान्टा, मार्गरिटा येथे स्थायिक झालेल्या या महाराष्ट्र कन्येच्या नावाची सध्या मोठी चर्चा आहे.

अंधेरी पश्चिम डीएननगर इमारत क्रमांक 22 मध्ये राहणारे तिचे आजोबा बाबाजी भोगले आणि आजी वैशाली भोगले यांची ती नात आहे.अमेरिकेत वास्तव्यास असलेले तिचे वडील चंद्रकांत भोगले हे मात्र जबरदस्त क्रिकेट शौकीन आणि वरचेवर तेथील स्थानिक क्रिकेट क्लब्स मधून खेळणारे एक हौशी खेळाडू. त्यामुळे घराभोवतीच्या प्रांगणात कधीतरी बाप-बेटींमध्ये क्रिकेटचा खेळ रंगणे स्वाभाविक होता. ती फुटबॉल या खेळात एक उत्तम गोलकीपर होती. ते होण्यासाठीच्या प्रक्रियेत तिने कमावलेली चपळता, शारीरिक लवचिकता व क्षमता, सांघिक वृत्ती, धाडस, जिंकण्याची जिद्द, आक्रमकता, हेतुपूर्वक व नियोजनपूर्वक धोका पत्करण्याची निर्भयता तिला एक उत्कृष्ट क्रिकेटर बनवू पाहत होते, घडवत होते. त्यातच तिच्यातील 'हार्ड-हिटींग' फलंदाज हळूहळू आपले स्ट्रोक्स दाखवू लागला. तिच्यामध्ये प्रकर्षाने दिसत असलेली ही प्रतिभा हेरून तिच्या वडिलांनी तिला, 'क्रिकेटचा जोश अनुभवून तरी बघ', असा सल्ला दिला.आणि आज वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तिने अमेरिकेत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

आज तिथे काँलेजच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या १८ वर्षीय गार्गीचा लहानपणापासूनच साँकर (फुटबॉल) खेळ हा जीव की प्राण होता. त्यापलिकडे तिच्यासाठी दुसरे काही विश्वच नव्हते. गोलकीपर, डिफेंडर, लेप्ट फाँरवर्ड पोझिशन अशी कुठल्याही भुमिका घेऊन ती मैदानावर उतरली तरी नेहमी सरस असायची, भारी ठरायची. प्रत्येक मॅचमध्ये सर्वात परिणामकारक, प्रभावशाली खेळ करून आपल्या संघाला विजयी करणे हाच तिचा ध्यास असायचा आणि लीग-मँचेस च्या माध्यमातून ती त्यादिशेने पुढे पुढे झेपावत होती.

सुरूवातीला गार्गी बॅटने चेंडू फटकविण्याच्या प्रत्येक अनुभवाची तुलना फुटबॉलला मारलेल्या किक बरोबर करायची, म्हणजे तिचं मन फुटबॉलकडे नेहमी किंचित झुकलेलं असायचं. पण मग एकदा तिने अमेरिकेच्या हाऊस्टन शहरात एका क्रिकेट स्पर्धेत 'फास्ट-फिफटी' काय ठोकली आणि त्यानंतर ती अशा काही प्रकारे क्रिकेटच्या प्रेमात पडली की आता 'दुनियाकी कोईभी ताकद अब उनको जुदा न कर सकेगी'. तेव्हा, गेल्या चार वर्षांपासून गार्गी "क्रिकेट केवळ खेळतच नाही आहे तर क्रिकेट जगते आहे'असे अमेरिकेत वास्तव्यास असंलेले तिचे वडील चंद्रकांत भोगले यांनी लोकमतला अभिमानाने सांगितले.

गरबा खेळण्याचा, दिवाळीच्या फराळांचा आस्वाद घेण्याचा, मालवणी पाक पद्धतीने बनविलेल्या सागोती-वड्यांवर मनसोक्त ताव मारण्याचा, फ्र॔टफुटवर येऊन क्रिकेट बाँलला आरपार ठोकण्याचा मोह अनावर होणाऱ्या या 'बाँर्न इन इंडिया' धडाकेबाज फलंदाजाने परदेशातही, मराठी पाऊल पुढे टाकवून दाखविण्याचे सामर्थ्य गाजवावे अशी इच्छा तिच्या आजी-आजोबांनी व्यक्त केली.

टॅग्स :अमेरिका
Open in App