Join us  

विजय मिळवण्याची धडपड, आज हैदराबाद, राजस्थान भिडणार

राजस्थानने आतापर्यंत सहापैकी दोन सामने जिंकले असून दुसरीकडे हैदराबादला सहापैकी केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. त्यांचा संघ आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार असल्याने या संघाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:07 AM

Open in App

नवी दिल्ली : यंदाच्या सत्रात निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेले दोन संघ रविवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. हे दोन संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद. दोन्ही संघांना विजयाची अत्यंत गरज असल्याने यावेळी चाहत्यांना तुंबळ लढाईची मेजवानी मिळणार हे नक्की.

राजस्थानने आतापर्यंत सहापैकी दोन सामने जिंकले असून दुसरीकडे हैदराबादला सहापैकी केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. त्यांचा संघ आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार असल्याने या संघाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान सातत्याने शानदार खेळ करण्यात अपयशी ठरत आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांचा संघ ढेपाळताना दिसला आहे. फलंदाजी पूर्णपणे जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्यावर अवलंबून आहे. मात्र दोघांच्याही कामगिरीत सातत्याचा अभाव राहिला आहे. 

हैदराबादची फलंदाजी डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो व केन विलियम्सन यांच्यावर अवलंबून आहे. वॉर्नरने दोन अर्धशतक झळकावली असली, तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजीत एकटा राशिद खान अपेक्षित कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्स