Join us  

महाराष्ट्राविरुद्ध पंजाब भक्कम स्थितीत, सलामीवीर जय पांडे एकटाच लढला

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पंजाबने निखिल चौधरी याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आपली पकड मजबूत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 9:22 PM

Open in App

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पंजाबने निखिल चौधरी याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आपली पकड मजबूत केली आहे. पंजाबने दिवसअखेर एकूण २६८ धावांची आघाडी घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या बोनसगुणासह विजय मिळवण्याच्या आशादेखील धूसर झाल्या आहेत.दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अष्टपैलू खेळाडू निखिल चौधरी ६५ चेंडूंत १ षटकार व एका चौकारासह ३१ आणि कर्णधार करण कैला ६ धावांवर खेळत आहेत. त्याआधी कालच्या २ बाद ३४ या धावसंख्येवरून खेळणा-या महाराष्ट्राचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ११४ धावांत कोसळला. महाराष्ट्राकडून सलामीवीर जय पांडे एकटाच लढला. मनप्रीतसिंगला सुरेख हूकचा चौकार मारणा-या जय पांडे याने १८८ मिनिटे खेळपट्टीवर तग धरताना ६ चौकारांसह ५३ धावांची झुंजार खेळी केली.प्रशांत कोरे (६), निखिल नाईक (४), शमशुझमा काझी (४) आणि या सामन्यात संधी मिळणा-या जालना येथील ऋषिकेश काळे (१) यांनी उपस्थित चाहत्यांची घोर निराशा केली. जय पांडे (५३), विजय झोल (१६) आणि शुभम कोठारी (१७) हे तिघेच दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकले. पंजाबकडून सनवीरसिंग याने १७ धावांत ३ गडी बाद केले. त्याला निखिल चौधरीने ३३ धावांत ३, मनप्रीतसिंगने ३६ धावांत २ आणि कर्णधार करण कैला याने १९ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली.त्यानंतर पहिल्या डावात १0२ धावांची आघाडी घेणा-या पंजाब संघाने दुस-या दिवशी ६ बाद १६६ अशी धावसंख्या उभारताना एकूण २६८ धावांची आघाडी घेताना आपली स्थिती आणखी भक्कम केली. पहिल्या डावात ७१ धावांची निर्णायक खेळी करणा-या निखिल चौधरीने पंजाबकडून दुस-या डावात नाबाद ३१ धावांची खेळी केली. सलामीवीर प्रभज्योतसिंगने ७६ चेंडूंत ५ चौकारांसह ३४, सनवीरसिंगने ६२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह २७ आणि तलविंदरसिंग याने ५५ चेंडूंत ३ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात ५ गडी बाद करणा-या शुभम कोठारीने दुस-या डावातही ५९ धावांत २ गडी बाद केले. जगदीश झोपेने ३६ धावांत २, तर शमशुझमा काझीने २६ धावांत १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकपंजाब : पहिला डाव २१६. दुसरा डाव : ६ बाद १६६. (प्रभज्योतसिंग ३४, निखिल चौधरी खेळत आहे ३१, सनवीरसिंग २५, हिमांशू शर्मा २७, तलविंदरसिंग २४. जगदीश झोपे २/३६, शुभम कोठारी २/५९, शमशुझमा काझी १/२६).महाराष्ट्र : पहिला डाव : सर्वबाद ११४. (जय पांडे ५३, शुभम कोठारी १७, विजय झोल १६. सनवीरसिंग ३/१७, निखिल चौधरी ३/३३, करण कैला २/१९, मनप्रीतसिंग २/३६).

Open in App