Join us  

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट बंद करा; केवळ विश्वचषकापुरता खेळवा, रवी शास्त्रींची मागणी

रवी शास्त्रींची मागणी ; केवळ विश्वचषकापुरता खेळवा टी-२० सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 9:32 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘टी-२० क्रिकेट द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी मुळीच नाही. हा प्रकार केवळ विश्वचषकापर्यंतच मर्यादित असायला हवा. टी-२० सामन्यांच्या द्विपक्षीय मालिका कुणी लक्षातही ठेवत नसल्याने हा प्रकार लवकर बंद व्हायला हवा,’ अशी आगळीवेगळी मागणी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. शास्त्री यांनी ही मागणी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्याच्या टी-२० मालिकेआधी केली, हे विशेष. 

सर्वात यशस्वी भारतीय प्रशिक्षकांपैकी एक असलेले शास्त्री म्हणाले,‘चाहत्यांचा रोमांच वाढविण्यासाठी आणि उत्सुकता शिगेला पोहोचविण्यासाठी टी-२० लीग पुरेशी आहे. पाठोपाठ दोन वर्षातून एकदा टी-२० विश्वचषकाचे आयोजन होतेच. टी-२० प्रकारात अलीकडे द्विपक्षीय आयोजन वाढले आहे.  याआधी इतके आयोजन मी कधीही पाहिलेले नाही. मी प्रशिक्षक असतानाही मोठ्या प्रमाणावर आयोजन व्हायचे. द्विपक्षीय टी-२० मालिका कुणीही लक्षात ठेवत नसल्यामुळे टी-२० क्रिकेटचे आयोजन फुटबॉलप्रमाणे व्हायला हवे. फुटबॉलमध्ये केवळ विश्वचषकाला अनन्यसाधारण महत्त्व असते.’ 

भारताचे प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी संपला. ते म्हणाले,‘प्रशिक्षक या नात्याने टी-२० विश्वचषकाचा अपवाद वगळता मला एकही टी-२० सामना स्मरणात नाही. एखादा संघ विश्वचषक जिंकला की सामने स्मरणात राहतात. दुर्दैवाने आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही, त्यामुळे मला सामनेही आठवत नाहीत.  जगभरात फ्रेंचाइजी क्रिकेट खेळले जात असून, प्रत्येक देशाला स्वत:चे फ्रेंचाइजी क्रिकेट आयोजनाची परवानगी आहे.  त्यांचे ते स्थानिक आयोजन असते. याशिवाय दर दोन वर्षांनी टी-२० विश्वचषक खेळला जातो.’ आयपीएलचे पुढील पाच वर्षांचे मीडिया हक्क जूनमध्ये विकले जातील. 

आयपीएलनंतर काहींनी निराशाही व्यक्त केली

आयपीएलच्या भविष्याची चर्चा करताना माजी सलामीवीर आकाश चोप्रा म्हणाला,‘माझ्या मते भविष्यात प्रत्येक कॅलेंडर वर्षांत आयपीएलचे आयोजन दोन टप्प्यात होऊ शकेल.  शास्त्री यांनी आकाशच्या मताशी सहमती दर्शविली. ते म्हणाले,‘हेच भविष्य असेल. हे शक्य आहे. १४० सामन्यांचे आयोजन ७०-७० अशा टप्प्यात होऊ शकेल. काहींना वाटेल क्रिकेटचा ओव्हरडोस आहे.’सेच, ‘भारतात काहीही ओव्हरडोस नाही. बायोबबलच्या बाहेरील लोकांची उत्कंठा फार मोठी आहे. यंदाचे आयपीएल संपल्यानंतर काहींनी निराशाही जाहीर केली,’ असेही शास्त्री म्हणाले.

टॅग्स :रवी शास्त्रीटी-२० क्रिकेट
Open in App