Join us  

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तान पुन्हा भारतासमोर झुकणार; ICC ने स्पष्टच सांगितले

या नियमाची कायमस्वरूपी सुरुवात यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 8:29 AM

Open in App

दुबई : सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या स्टॉप क्लॉक नियम जून २०२४पासून सर्व आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या सामन्यांत कायमस्वरूपी लागू होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. या नियमाची कायमस्वरूपी सुरुवात यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून होईल. आयसीसीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) डिसेंबर २०२३मध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्टॉप क्लॉक नियम लागू केला होता. सध्या अनेक सामन्यांत या नियमाचा वापर होत असून, १ जून २०२४पासून हा नियम कायमस्वरूपी लागू होईल. आयसीसीने आपल्या वार्षिक बैठकीनंतर सांगितले की, ‘स्टॉप क्लॉक नियम जून २०२४ पासून वेस्ट इंडीज-अमेरिका येथे होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून सर्व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत लागू होईल. या नियमाचा प्रायोगिक तत्त्वावर एप्रिल २०२४ पर्यंत अवलंब होणार होता. पण, यातून सकारात्मक निकाल मिळाले असून, सामने निर्धारित वेळेत समाप्त होत आहेत. या नियमामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे २० मिनिटांची बचत होत आहे.’

बीसीसीआयवर दबाव आणणार नाही : आयसीसी 

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसी बीसीसीआयवर दडपण आणणार नाही, असे आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. राजकीय संबंधामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणे जवळपास अशक्य आहे. आयसीसी सूत्राने सांगितले की, ‘भारतीय सरकारची नीती विरोधात असेल तर आयसीसी भारताच्या सहभागाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळविण्याचा एक पर्याय आहे. बोर्डाच्या बैठकीत प्रत्येक सदस्य आपला मुद्दा मांडतो आणि त्यावर मतदान होते. परंतु, सदस्य देशाच्या सरकारने एखाद्या ठिकाणी खेळण्यास नकार दिला, तर आयसीसीला यासाठी पर्याय शोधावे लागतात.’

राखीव दिवसाला मंजुरी

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य (२७ जून) आणि अंतिम सामन्यासाठी (२९ जून) राखीव दिवस ठेवण्याबाबतही शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचप्रमाणे साखळी फेरीत आणि सुपर आठ फेरीत सामना पूर्ण खेळवण्यासाठी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान पाच षटके खेळणे गरजेचे असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. त्याचवेळी, बाद फेरीत मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला किमान दहा षटके खेळावी लागतील. यावेळी आयसीसीने भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२६ सालच्या टी-२० विश्वचषक पात्रता प्रक्रियेलाही मंजुरी दिली.

भारत- पाक लढतीला राखीव दिवस?

९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणारा भारत वि. पाकिस्तान सामना काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्यास या सामन्यासाठीही राखीव दिवसाची तरतूद असेल,अशी चर्चा आहे. आयसीसीने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

स्टॉप क्लॉक म्हणजे काय?

स्टॉप क्लॉक नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक षटक संपल्यानंतर पुढील षटकाला ६० सेकंदांमध्ये सुरुवात करावी लागेल. यासाठी मैदानावरील स्क्रीनवर ६० सेकंदांचे काउंटडाउनही सुरू करण्यात येईल. तिसऱ्या पंचाकडून हे काउंटडाउन सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात येईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेळेची ही मर्यादा पाळता आली नाही, तर त्यांना दोनवेळा सूचित करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक उशिरासाठी पाच धावांचा दंड ठोठावण्यात येईल. दरम्यान, यामध्ये काही अपवादही समाविष्ट करण्यात आले आहेत. बळी गेल्यानंतर नवा फलंदाज मैदानावर येत असताना, ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तसेच एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झालेला असेल तर स्टॉप क्लॉक नियम लागू होणार नाही.

 

टॅग्स :आयसीसीबीसीसीआय