Join us  

ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक, विजयानंतर हॉटेलमध्ये परतताना फेकला दगड, काचा फुटल्या

गुवाहाटीमध्ये दुस-या टी-20 सामन्यात भारताचा पराभव करून हॉटेलमध्ये परतताना ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर मोठा दगड फेकण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 7:13 AM

Open in App

गुवाहाटी: गुवाहाटी येथे दुस-या टी-20 सामन्यात भारताचा पराभव करून हॉटेलमध्ये परतताना ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर मोठा दगड फेकण्यात आला. बसच्या काचा यामुळे फुटल्या आहेत. कोणी मुद्दाम हा दगड फेकला का याबाबत अजूनपर्यंत काहीही माहिती उपलब्ध नाही. 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिंच याने या घटनेचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत . हॉटेलमध्ये जाताना बसच्या खिडकीवर दगड फेकण्यात आला. हे खूप भयावह होतं असं ट्वीट त्याने केलं.

अॅरॉन फिन्चचं हे ट्विट डेव्हिड वॉर्नरनेही रिट्विट केलं आहे. मात्र, या घटनेवर अजूनपर्यंत बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. कारण ज्या खिडकीजवळ दगड फेकण्यात आला तेथे कोणीही बसलं नव्हतं अशी माहिती आहे.  गेल्या 5 आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या बसवर दगड फेकण्याची ही दुसरी घटना आहे. बांगलादेश दौ-यावरही अशीच घटना घडली होती.  

आॅस्ट्रेलियाने गुवाहाटीतील दुस-या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला. यासह कांगारूंनी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे शुक्रवारी होणा-या अखेरच्या टी-20 सामन्याला आता अंतिम सामन्याचे स्वरूप आले आहे.