ब्रिस्बेन : कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आज येथे पहिल्या अॅशेज कसोटीच्या तिसºया दिवशी इंग्लंडवर पहिल्या डावात आघाडी घेतली आणि त्यानंतर जोश हेजलवूडने पाहुण्या संघांचे दोन फलंदाज तंबूत धाडताना त्यांना संकटात टाकले.
आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाबाद १४१ धावा केल्या जी की त्याची सर्वोत्तम कसोटी खेळींपैकी एक आहे. त्याने साडेआठ तास खेळपट्टीवर तग धरला. त्याच्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ३२८ धावा करीत २६ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव ३०२ धावांत आटोपला होता.
त्यानंतर वेगवान गोलंदाज हेजलवूड याने पाहुण्या संघांच्या संकटात आणखी भर टाकताना प्रारंभीच्या दोन षटकात त्याने अॅलेस्टर कूक (७) आणि जेम्स विंस (२) यांना तंबूत धाडले. त्यातच मिशेल स्टार्क याचा चेंडू जो रूट याच्या हेल्मेटवर आदळला. दिवसअखेर इंग्लंडने २ बाद ३३ धावा केल्या होत्या. रूट ५ आणि मार्क स्टोनमन १९ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार रूट याने स्मिथला बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर स्मिथसाठी त्याने ‘बॉडीलाइन’ स्टाइलचे क्षेत्ररक्षणही लावले; परंतु, या दिग्गज फलंदाजाने पाहुण्या संघाचे त्याला बाद करण्याचे प्रयत्न हाणून पाडताना आॅस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे आॅस्ट्रेलियाने १९८८ नंतर येथे एकही कसोटी गमावलेली नाही. स्मिथचे हे २१ वे कसोटी शतक आहे. त्याने ५९४ मिनिटे खेळपट्टीवर तग धरताना ३२६ चेंडूंत १४ चौकार मारले. स्मिथने ब्रॉडच्या चेंडूंवर कव्हरला चौकार मारताना आपले शानदार शतक पूर्ण केले आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. आॅस्ट्रेलियाच्या अखेरच्या सहा फलंदाजांनी २५२ धावांची भर धावसंख्येत टाकली. त्यात स्मिथला तळातील फलंदाज पॅट कमिन्स आणि नाथन लियोन यांची साथ लाभली.
कमिन्सने आपल्या कर्णधाराला महत्त्वपूर्ण साथ देताना त्याची कसोटीतील आधीची सर्वोच्च वैयक्तिक खेळी मागे टाकताना ४२ धावा केल्या आणि कर्णधारासोबत ६६ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियाने उपाहाराआधी शॉन मार्श, टीम पेन आणि मिशेल स्टार्क यांच्या विकेट गमावल्या. मार्शने आठवे कसोटी अर्धशतक ठोकले व अॅशेज लढतीतील त्याचे पहिले अर्धशतक ठरले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंडचा पहिला डाव : ३०२. दुसरा डाव : २ बाद ३३. (स्टोनमन खेळत आहे १९, जो रूट नाबाद ५. हेजलवूड २/११).
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३२८. (स्टीव्ह स्मिथ नाबाद १४१,
शॉन मार्श ५१, पॅट कमिन्स ४२. स्टुअर्ट ब्रॉड ३/४९, अँडरसन २/५०, अली २/७४).