नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूसोबत छेडखानी केल्याची कबुली दिल्यावर निर्माण झालेल्या वादानंतर राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. स्मिथवर आयसीसीने एका कसोटी सामन्याची बंदी घातली आहे. पण क्रिकेट आॅस्ट्रेलिया त्याला कठोर शिक्षा देण्याचा विचार करीत आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने कठोर शिक्षा देण्याचे संकेत मिळाल्यानंतरच स्मिथ रॉयल्सचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
रॉयल्सचे क्रिकेट प्रमुख जुबिन भरुचा यांनी सांगितले की,‘स्टीव्हच्या मते सध्याची परिस्थिती लक्षात घेता राजस्थान रॉयल्सच्या हितासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देणे योग्य आहे. त्यामुळे संघाला आयपीएलसाठी कुठल्याही अडचणीविना सज्ज होण्यास मदत मिळेल. स्मिथने बीसीसीआय व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहे.’
भरुचा पुढे म्हणाले, ‘केपटाऊन घटनेमुळे क्रिकेटविश्व अडचणीत आले आहे. आम्ही बीसीसीआयच्या संपर्कात असून त्यांच्याकडून सल्ला घेत आहोत. तसेच आम्ही स्मिथच्या संपर्कातही आहोत.’ रॉयल्सचे मेंटर शेन वॉर्न केपटाऊनमध्ये असून त्याची स्मिथसोबत चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.
‘स्मिथ लज्जास्पद’
आॅस्ट्रेलियन मीडियाने चेंडूशी छेडछाड प्रकरणात आपल्या देशाच्या क्रिकेटपटूवर कठोर टीका करताना त्यांनी देशाला बदनाम केल्याचे म्हटले आहे. सध्याच्या नेतृत्वात संघाची संस्कृती लोप पावल्याचीही टीका केली आहे.
कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यादरम्यान चेंडूसोबत छेडछाड करण्याची योजना आखल्याची कबुली दिल्यानंतर मीडियामध्ये अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
आॅस्ट्रेलियात क्रिकेट राष्ट्रीय खेळ मानला जातो व या घटनेमुळे क्रीडा चाहत्यांना धक्का बसला.
‘दी आॅस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने ‘लज्जास्पद स्मिथ’ असे शीर्षक दिले आहे. यात क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांना राजीनामा देण्याचे आवाहन करताना लिहिले की, त्यांनी वरिष्ठ पातळीवर खेळाची लोप पावत चाललेली संस्कृती बदलण्यासाठी काही विशेष केले नाही.’
आॅस्ट्रेलियाच्या निर्णयाची प्रतीक्षा...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे सनरायजर्स हैदराबादचा मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मणने याबाबत फ्रेंचायझी क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार असल्याचे म्हटले आहे. वॉर्नर चेंडूची छेडछाड केल्याच्या वादात अडकला आहे.
स्टीव्ह स्मिथ व वॉर्नर यांचा केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यात तिसºया दिवशी चेंडूची छेडछाड प्रकरणात सहभाग असल्यामुळे त्यांनी आॅस्ट्रेलिया संघाचे अनुक्रमे कर्णधार व उपकर्णधारपद सोडले आहे.
लक्ष्मण म्हणाला, ‘केपटाऊन कसोटीमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. सनरायजर्सबाबत विचार करता यावर भाष्य करणे घाईचे ठरेल. कारण हे प्रकरण शनिवारीच घडले आहे. आम्ही क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू.’
वॉर्नरविषयी लक्ष्मण म्हणाला की, सनरायजर्स सध्या याबाबत विचार करीत नाही. सध्याची माहिती मर्यादित असून आम्हाला अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. गरज भासल्यास आम्ही चर्चा करू. वॉर्नरने सनरायजर्सचे चांगले नेतृत्व केले आहे.’
आशिष नेहराने केली स्मिथची पाठराखण
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराने चेंडू छेडछाड प्रकरणी वादात अडकलेले आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची पाठराखण करताना त्यांनी आयपीएलमधून माघार घ्यायला नको, असे म्हटले आहे.
नेहरा म्हणाला,‘स्मिथने आपली चूक कबूल करणे मोठी बाब आहे. त्यांनी जर चुकीचे केले असेल तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आयसीसीचा आहे. स्मिथने आपली चूक कबूल केली, त्याला त्याचे श्रेय द्यायला हवे. अर्थात असे प्रकरण प्रथमच घडलेले नाही. अशा गोष्टी कसोटी क्रिकेटमध्ये होतात. यापूर्वीही असे अनेकदा घडले आहे.’
नेहरा पुढे म्हणाला,‘स्मिथ व वॉर्नर यांच्यासारख्या खेळाडूंना गमावणे आयपीएल संघासाठी दु:खदायक आहे. जे घडायचे ते घडून गेले, आता पुढे वाटचाल करायला हवी. क्रिकेट असो व अन्य दुसरा खेळ असो, चांगल्या-वाईट बाबी घडत असतात. त्या सर्व विसरून भविष्याबाबत विचार करायला हवा. त्यांच्याकडे नेतृत्व सोपवायचे किंवा नाही, हा सर्वस्वी त्यांच्या आयपीएल फ्रॅन्चायझीचा निर्णय आहे.’