Star Sports Confirms Suresh Raina As Commentator in IPL 2022 : सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर एकाही संघाने बोली लावली नाही. अखेरच्या क्षणाला चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्याला पुन्हा संघात घेतील अशी आशा होती, परंतु तसे झाले नाही. Mr. IPL सुरेश रैनाला डावलल्यानं चाहते निराश झाले होते आणि त्यांनी CSK ला ट्रोलही केले. यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये तरी रैना खेळताना दिसणार नाही हे स्पष्ट झाले. पण, सुरेश रैना IPL 2022 त परतला आहे आणि तो आता समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ''मी खूप खूप आनंदी आहे आणि नवीन भूमिकेसाठी तयार असल्याची,''प्रतिक्रिया त्याने दिली.
रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.
सुरेश रैना म्हणाला,''यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंना मिळालेली कोट्यवधींची बोली पाहून आनंद झाला. फ्रँचायझी आणि कर्णधार यांना खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. मोठी किंमत मिळाल्यानंतर खेळाडूच्या कामगिरीवर झालेला परिणाम आपण अनेकदा पाहिला आहे. पण, जर त्या खेळाडूने सुरुवात चांगली केली तर पुढील मार्ग सुकर होतो.''
''आयपीएल २०२२त इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष् असणार आहे,''असेही तो म्हणाला.