मुंबई : आयपीएलच्या आगामी सत्रासाठी गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने करार कायम न राखल्यानंतर श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने फ्रेंचाईजी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १७० बळींची नोंद मलिंगाच्या नावावर आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच मलिंगाने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध राहणार नव्हता. एका पत्रकाद्वारे मुंबई इंडियन्सने मलिंगाच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली. मलिंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली असून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगा अद्यापही खेळतो. गेल्या वर्षी त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कोरोनामुळे २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ‘ कुटुंबायांशी चर्चेनंतर सर्व प्रकारच्या फ्रेंचाईजी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ असल्याचे मला जाणवले,’ असे मलिंगाने एका पत्रकाद्वारे सांगितले.