कोलकाता : चार फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने बोर्ड एकादशविरुद्ध सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा गड्यांच्या मोबदल्यात ४११ धावा उभारल्या.
रुदिरा समरविक्रमाने ७७ चेंडूंत ७४, दिमूथ करुणारत्ने याने ५०, यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाने ५३ आणि अँजेलो मॅथ्यूज याने नाबाद ५४ धावांचे योगदान दिले.
आठव्या स्थानावर आलेला दिलरुवान परेरा याने ४४ चेंडूंत ४८ धावा ठोकल्या. अंधुक सूर्यप्रकाशामुळे ८८ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला. याचवेळी लंकेने पहिला डावदेखील घोषित केला. त्याआधी बोर्ड एकादशचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संघात पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज याने ५४ धावा केल्या. पाकविरुद्ध दुबईत कसोटी पदार्पण करणारा समरविक्रमा याने मारलेले फटके अप्रतिम होते. डावखुरा फलंदाज करुणारत्ने याची त्याला चांगली साथ लाभली. दोघांनी सलामीला १६ षटकांत १०२ धावांची भागीदारी केली. (वृतसंस्था)
फिरकीचा सहज सामना
बोर्ड एकादशचे फिरकीपटू जलज सक्सेना आणि आकाश भंडारी यांचा सर्व फलंदाजांनी सहजपणे सामना केला. समरविक्रमाला आवेश खान याने बाद केले. मॅथ्यूजने चहापानापर्यंत ९३ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल याने २९ धावा काढल्या. बोर्ड एकादशकडून आवेशने ११ षटकांत ६६ धावांत एक, वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर आणि लेगस्पिनर आकाश भंडारी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
धावफलक
श्रीलंका : ६ बाद ४११ डाव घोषित.
रुदिरा समरविक्रमा झे. अग्रवाल गो. आवेश खान ७४, करुणारत्ने रिटायर्ड हर्ट ५०, लाहिरु थिरीमन्ने झे. जीवनज्योत सिंह गो. भंडारी १७, अँजेलो मॅथ्यूज रिटायर्ड हर्ट ५४, दिनेश चंदीमल रिटायर्ड हर्ट २९, निरोशन डिकवेला नाबाद ७३, दासून शनाका झे. जीवनज्योत सिंह गो. जलज सक्सेना २, दिलरुवान परेरा झे. अभिषेक गुप्ता गो. संदीप वॉरियर ४८, डिसिल्वा झे. अनमोलप्रीत सिंह गो. संदीप वॉरियर १०, रोशन सिल्वा नाबाद ३६, रंगाना हेराथ त्रि. गो. भंडारी. ३ अवांतर : १५.
गोलंदाजी - संदीप वॉरियर १५-३-६०-२, रविकिरण १२-२-६०-०, आवेश खान १६-०-६८-१, जलज सक्सेना २२-०-१००-१, आकाश भंडारी २३-१-१११-२.