Join us  

वचपा काढला! रोहितची डबल सेंच्युरी, लंकेच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा

कर्णधार रोहित शर्माच्या डबल सेंच्युरीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 393 धावांचे विराट लक्ष्य ठेवले आहे. कर्णधारपदाला साजेशी खेळी करत रोहितने 153 चेंडूत नाबाद (208) धावा तडकावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:32 AM

Open in App
ठळक मुद्देधर्मशालामध्ये पत्करावा लागलेला पराभव भारतीय संघासाठी धोक्याचा इशारा देणारा आहे.या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. 

मोहाली - कर्णधार रोहित शर्माच्या डबल सेंच्युरीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 393 धावांचे विराट लक्ष्य ठेवले आहे. कर्णधारपदाला साजेशी खेळी करत रोहितने 153 चेंडूत नाबाद (208) धावा तडकावल्या. डबल सेंच्युरी झळकवताना रोहितने 13 चौकार आणि 12 षटकार लगावले. वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी झळकावणार रोहित एकमेव फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने फटकावलेली ही दुसरी डबल सेंच्युरी आहे.  

पहिल्या वनडेमध्ये भारताला भारी पडलेल्या लकमल, प्रदीपच्या गोलंदाजीचा रोहित शर्माने अक्षरक्ष पालापाचोळा केला. फर्नाडोच्या 10 षटकात भारताने 106 धावा वसूल केल्या तर लकमलच्या 8 षटकात 71 धावा चोपून काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थित असलेल्यांना आणि सामना पाहणा-यांना भारताच्या स्कोरपेक्षा रोहितच्या डबल सेंच्युरीची जास्त चिंता लागली होती. संघाचा स्कोर किती होतोय यापेक्षा रोहित द्विशतक फटकावतोय का ? याकडेच सगळयांचे लक्ष्य लागले होते. रोहितचे द्विशतक होताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. श्रेयस अय्यरनेही जोरदार फटकेबाजी करत रोहित शर्माबरोबर दुस-या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने (88) धावा तडकावल्या. एमएस धोनी (7) धावांवर पायचीत झाला. 

त्यापूर्वी सलामीवीर शिखर धवननेही अर्धशतकी खेळी केली. शिखरने 67 चेंडूत (68) धावा तडकावताना 9 चौकार ठोकले. त्याला पाथीरानाने थिरीमानेकरवी झेलबाद केले. रोहित आणि शिखरने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. पहिल्या वनडेत भारताचा डाव अवघ्या 112 धावात संपुष्टात आला होता. त्या लाजिरवाण्या पराभवाचा भारताने आज पुरेपूर वचपा काढला. 

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय चांगलाच अंगलट आला. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' आहे. पहिल्या वन-डेमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे असे भारताच्या फलंदाजीकडे पाहून वाटत होते. या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉशिंग्टन सुंदर अवघा 18 वर्षांचा आहे. 

टॅग्स :क्रिकेट