Join us  

श्रीलंकेचा ५ गड्यांनी विजय, बांगलादेशचा पराभव; असलंका, भानुका यांचे अर्धशतक

पहिल्याच षटकात लंकेला धक्का देत बांगलादेशने चांगली सुरुवात केली. पथुम निसांका आणि चरिथ असलंका यांनी ६९ धावांची भागीदारी करत लंकेला सावरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 5:39 AM

Open in App

शारजा : पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या श्रीलंकेने टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सुरुवात करताना बांगलादेशचा ५ गड्यांनी पराभव केला. मोठी धावसंख्या उभारून बांगलादेशने चांगली पकड मिळवली होती. मात्र, गोलंदाजांचा सुमार मारा आणि गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ४ बाद १७१ धावा उभारल्या. लंकेने १८.५ षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या.पहिल्याच षटकात लंकेला धक्का देत बांगलादेशने चांगली सुरुवात केली. पथुम निसांका आणि चरिथ असलंका यांनी ६९ धावांची भागीदारी करत लंकेला सावरले. मात्र, बांगलादेशने ८ धावांत ३ बळी घेत लंकेची ४ बाद ७९ धावा अशी अवस्था करत पकड मिळवली. येथून असलंका व भानुका राजपक्ष यांनी सूत्रे सांभाळत पाचव्या गड्यासाठी निर्णायक ८६ धावांची भागीदारी करत लंकेला विजयी केले. १६ व्या षटकात भानुकाने सैफुद्दीनला २२ धावांचा चोप देत सामना फिरविला. शाकीब हल हसनने नवव्या षटकात २ बळी घेत बांगलादेशला जबरदस्त पकड मिळवून दिली होती. भानुकाचे दोन सोपे झेल सोडत बांगलादेशने लंकेच्या विजयात हातभारच लावला. असलंकाने ४९ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८०, तर भानुकाने ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५३ धावांचा चोप दिला. त्याआधी, मोहम्मद नईम व मुशफिकूर रहीम यांच्या जोरावर बांगलादेशने आव्हानात्मक मजल मारली. अडखळती सुरुवात झाल्यानंतर नईम व रहीम यांनी तिसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. नईमने ५२ चेंडूंत ६ चौकारांसह ६२ धावा, तर रहीमने ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या.

 संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : २० षटकांत ४ बाद १७१ धावा (मोहम्मद नईम ६२, मुशफिकुर रहिम नाबाद ५७; चमिका करुणारत्ने १/१२, बिनुरा फर्नांडो १/२७, लाहिरु कुमारा १/२९.) श्रीलंका : १८.५ षटकांत ५ बाद १७२ धावा (चरिथ असलंका नाबाद ८०, भानुका राजपक्ष ५३; शाकिब अल हसन २/१७, नसुम अहमद २/२९.)

मैदानात फुल राडा! चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नईमने मारलेला चेंडू लाहिरूच्या हातात गेला आणि लाहिरूने पुढे आलेल्या नईमच्या दिशेने चेंडू फेकला. सहाव्या षटकात लाहिरूने दासला बाद केले. यावेळी दासला लाहिरूने छेडले व दोघे एकमेकांवर धावून गेले.   

टॅग्स :श्रीलंका
Open in App