Join us  

बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच वन-डे विश्वचषकात श्रीलंकेवर मिळवला विजय

BAN vs SL MATCH UPDATES : श्रीलंकेच्या चरिथ असलंकाची शतकी खेळी व्यर्थ, कर्णधार शाकिब आणि शांतोच्या अर्धशतकामुळे बांग्लादेशचा मोठा विजय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 10:15 PM

Open in App

Sri Lanka Vs Bangladesh World Cup 2023 LIVE : बांग्लादेश आणि श्रीलंका, यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेवर तीन विकेट्स राखून पराभव केला. बांग्लादेशचा विश्वचषकात श्रीलंकेवर हा पहिलाच विजय आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेचे आव्हान बांग्लादेशने ४२ व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. 

बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४९.३ षटकांत सर्वबाद २७९ धावांवर बाद झाला. हे २८० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशने ४१.१ षटकात ७ गडी गमावून विजय मिळवला. बांग्लादेशकडून कर्णधार शाकिब अल हसनने ८२ धावांची आणि नझमुल हसन शांतोने ९० धावांची खेळी केली. 

प्रथम फलंदाजी करताना चरिथ असलंकाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभारली. पथुम निसांकाने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी करून श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर बांगलादेशने पुनरागमन करताना श्रीलंकेच्या कुसल परेरा (४) आणि कुसल मेडिंस (१९) यांना स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने (४१) धावांची सावध खेळी करून लंकेचा डाव पुढे नेला. मग असलंकाने १०५ चेंडूत १०८ धावांची अप्रतिम खेळी करून बांगलादेशसमोर सन्मानजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.

मॅथ्यूजच्या विकेटवरून वादश्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला अन् वाद चिघळला. मॅथ्यूज आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये बाचाबाची देखील झाली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकन खेळाडूने हेल्मेट फेकून दिले. खरं तर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने 'टाईम आऊट'चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. मॅथ्यूजच्या विकेटचा परिणाम दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळाला अन् पंचांना मध्यस्थी करावी लागली. 

आजच्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ -शाकीब अल हसन (कर्णधार), तंजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसैन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिश तीक्ष्णा, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकाबांगलादेश