श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या (WTC 2025-27) नव्या हंगामाला सुरुवात झालीये. हा सामना श्रीलंकेचा स्टार अँजेलो मॅथ्यूज याच्यासाठी खास आहे. कारण बांगलादेश विरुद्ध तो आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. श्रीलंकेच्या या खेळाडूसाठी हिटमॅन रोहित शर्मानं खास मेसेज शेअर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकन स्टारसाठी रोहित शर्माचा खास मेसेज
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं श्रीलंकन दिग्गजासोबतच्या खास आठवणींना उजाळा देत त्याने क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदान सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मानं म्हटलंय की, “अरे अँजी (अँजेलो मॅथ्यू). तुझ्या अविस्मरणीय कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. शेवटचा सामना तुझ्यासाठी अन् संघासाठी सर्वोत्तम ठरो. अंडर-१९ च्या काळापासून आपल्यात चांगले प्रतिस्पर्धा झाली. तू तुझ्या देशासाठी प्रामाणिकपणे सर्वोत्तम योगदान दिले आहेस. प्रत्येकाला तुझ्या योगदानाची कदर असेल, याची खात्री वाटते. अनेकांना जे शक्य झाले नाही ते तू करून दाखवले आहेस. मैदानात भेट झाली नाही तर मैदानाबाहेर भेटत राहू, अशा आशयाच्या शब्दांत रोहित शर्मानं श्रीलंकन स्टारला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
संघातील सहकाऱ्यांनी दिला गार्ड ऑफ ऑनर
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामना गॉलच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला अँजेलो मॅथ्यूज आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११९ व्या सामन्यानंतर थांबणार आहे. १६ वर्षे श्रीलंकन क्रिकेट संघाला योगदान देणाऱ्या या स्टार खेळाडूला संघातील खेळाडूंनी फिल्डिंगला जाण्याआधी गार्ड ऑफ ऑनर दिल्याचेही पाहायला मिळाले.
अँजेलो मॅथ्यूजआधी रोहितनंही घेतलीये कसोटीतून निवृत्ती
अँजेलो मॅथ्यूज आधी रोहित शर्मानंही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी ३७ वर्षीय भारतीय क्रिकेटरनं अचानक कसोटीतून निवृत्ती घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपला निर्णय जगजाहीर केला होता. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूज प्रमाणे त्याला निरोपाचा सामना काही मिळाला नाही. टी-२० अन् कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आता फक्त वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे.
Web Title: Sri Lanka vs Bangladesh 1st Test Rohit Sharma Shares Emotional Message For Angelo Mathews On Test Retirement Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.