Join us  

Record Alert : श्रीलंकन संघाचा ट्वेंटी-20 धावांचा एव्हरेस्ट अन् ऐतिहासिक विजय

दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यांत श्रीलंकनं संघानं धावांचा एव्हरेस्ट उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 4:21 PM

Open in App

दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यांत श्रीलंकनं संघानं धावांचा एव्हरेस्ट उभा केला. विशेष म्हणजे त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचा डाव 30 धावांत गुंडाळून विक्रमाची नोंदही केली. पोखरा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी श्रीलंकेच्या महिला संघानं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील तिसऱ्या सर्वोत्तम धावसंख्येची नोंद केली. त्यांनी मालदीव संघाविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवणाऱ्या संघांत थेट तिसरे स्थान पटकावले.

प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 279 धावा चोपल्या. उमेशा थिमाशीनी ( 18) आणि जनादी अनाली ( 32) हे माघारी परतल्यानंतर हर्षिता माधवी आणि सथ्या संदीपनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. शिवाय सर्व ट्वेंटी-20 क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. कर्णधार हर्षितानं 47 चेंडूंत 15 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 106 धावा केल्या. सथ्यानं 48 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 96 धावा कुटल्या. या दोघींच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेनं 279 धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना मालदीवच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. अनालीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सथ्यानं 2 विकेट्स घेत मालदिवचा संपूर्ण संघ 30 धावांत माघारी पाठवला. 

महिला क्रिकेटपटूचा T20 त वर्ल्ड रेकॉर्ड; पुरुष गोलंदाजालाही असं जमलं नाही

नेपाळच्या महिला क्रिकेटपटूनं सोमवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली होती. महिलांच्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हा पराक्रम केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणालाही जमलेली नाही. मालदिव आणि नेपाळ यांच्यात हा ट्वेंटी-20 सामना झाला आणि नेपाळनं 10 विकेटे्स आणि 115 चेंडू राखून हा सामना जिंकलाही. पण, या सामन्यात नेपाळच्या गोलंदाजाची कामगिरी लक्षणीय ठरली. आतापर्यंत पुरुष क्रिकेटपटूलाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

प्रथम फलंदाजी करताना मालदिवचा संपूर्ण संघ 10.1 षटकांत अवघ्या 16 धावाच करू शकला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हम्झा नियाझ (9) आणि हाफ्सा अब्दुल्लाह ( 4) यांनाच खातं उघडता आले. अन्य आठ फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यांना तीन अतिरिक्त धावा मिळाल्या. नेपाळनं पाच चेंडूंत हे लक्ष्य पार केले. नेपाळच्या काजल श्रेष्ठानं 5 चेंडूंत 3 चौकार मारताना 13 धावा केल्या आणि चार अतिरिक्त धावा मिळाल्या.

या सामन्यात नेपाळच्या अंजली चांदनं 2.1 षटकांत 2 निर्धाव षटक टाकले आणि सहा विकेट्स घेतल्या. करुणा भंडारीनं 4 धावांच 2 विकेट्स घेतल्या. एकही धाव न  देता सहा विकेट्स घेणारी अंजली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच गोलंदाज ठरली. आतापर्यंत पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

टॅग्स :श्रीलंकामालदीव