Join us  

आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाने मारली बाजी

नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 8:45 PM

Open in App
ठळक मुद्देनॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने  पश्चिम विभागाच्या फलंदाजांना 124 धावांत रोखूनच अर्धी लढाई जिंकली होती.

मुंबई : संपूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणाऱ्या यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी  दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर 6 विकेट्स राखून मात केली.

 दिव्यांग खेळाडूंसाठी स्फूर्तीदायक ठरलेल्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी जिगरबाज खेळ करून उपस्थितांची मनं जिंकली. नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने  पश्चिम विभागाच्या फलंदाजांना 124 धावांत रोखूनच अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर अर्धी लढाई नरेंदरने जिंकून दिली. काल एका सामन्यात 99 धावांची जबरदस्त खेळी करणाऱया नरेंदरने अंतिम सामन्यातही 39 चेंडूंत 54 धावांची अफलातून खेळी करीत संघाचे जेतेपद जवळजवळ निश्चित पेले. नरेंदरने सलग तीन 30 पेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱया करून संघाला विजयासमीप नेले. नरेंदर12 व्या षटकांत बाद झाल्यानंतर सुगणेशने अष्टपैलून चमक दाखवत 15 चेंडूंत नाबाद 29 धावा ठोकत संघाच्या विजेतेपदावरही शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान दक्षिण विभागाच्या अष्टपैलू सुगणेशने मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज पश्चिम विभागाचा रोहन वाघेला तर दक्षिण विभागाचा फलंदाज नरेंदर ठरला. मध्य विभागाच्या मेहताब अलीला सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकाच्या पुरस्काराने गौरविले.

त्यापूर्वी,  यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली होती. पश्चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सुगणेशने मयुरेशचा त्रिफळा उडवून खळबळजनक सुरूवात केली. त्याननंतर सुगणेशने आपल्या पुढच्याच षटकांत तीन चेंडूंत कुणाल पटेल आणि सौरभ रवालियाला पायचीत करून पश्चिम विभागाची 3 बाद 13 अशी दुर्दशा केली. त्यानंतर असित जैसवारने कुणाल पानसेच्या साथीने आपल्या संघाची पडझड रोखली आणि संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 51 धावांची भागी रचली. कुणाल 28 धावांवर पायचीत झाल्यानंतर सौरभने आणखी दोन छोट्या भागीदाऱया करून संघाला 118 धावांपर्यंत नेले. मात्र 18 व्या षटकांत सौरभच्या 6 चौकार आणि 1 षटकाराचा झंझावात थांबताच त्यांचा डावही कोलमडायला फार वेळ लागला नाही. शेवटच्या दोन षटकांत त्यांना केवळ 6 धावांचीच भर घालता आली. प्रभावी गोलंदाजी करणाऱया सुगणेशने 13 धावांत 3 बळी टिपण्याची करामात करून दाखवली.

या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर, म़ाजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी, मुंबई दिव्यांग क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस विनायक  धोत्रे, कोषाध्यक्ष राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

संक्षिप्त धावफलकपश्चिम विभाग : 20 षटकांत सर्वबाद 124 (कुणाल पानसे 28, असित जैसवार 56; सुगणेश 13 धावांत 3 बळी) पराभूत वि. दक्षिण विभाग : 14.3 षटकांत 4 बाद 125 (नरेंदर 54, सुगणेश नाबाद 29 ; अजय म्हात्रे 22 धावांत 2 बळी)

टॅग्स :क्रिकेट