Sri Lanka Women vs South Africa Women, 18th Match : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १८ व्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. परिणामी हा सामना टी-२० प्रकारात खेळवण्याची वेळ आली. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात १०५ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियामनासर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १२१ धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीनं संघाला एकहाती विजय मिळवून दिला. लॉरा वॉल्व्हार्ड हिने ४७ चेंडूत नाबाद ६० धावांची खेळी केली. तंझिम ब्रिट्स हिने षटकार मारून मॅच संपवली. एवढेच नाही तर तिने ४२ चेंडूत अर्धशतकी डावही साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या जोडीची विक्रमी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या जोडीनं नाबाद शतकी भागीदारीसह संघाला विजय मिळवून देण्याशिवाय खास विक्रमालाही गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेच्या जोडीनं वनडे क्रिकेटमध्ये सातव्यांदा पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी नोंदवली आहे. या आधी लॉरानं लिझेल लीच्या साथीनं ७ वेळा सलामीला शतकी भागीदारी रचल्याचा रेकॉर्ड आहे.राचेल हायन्स आणि एलिसा हीली यांनीही ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या विकेटसाठी ७ वेळा अशी कामगिरी केली आहे. बेलिंडा क्लार्क आणि लिसा कीटली या ऑस्ट्रेलियन जोडीनं सर्वाधिक १० वेळा शतकी भागीदारी रचल्याचा विक्रम आहे.
दक्षिण आफ्रिका सेमीच्या उंबरठ्यावर, लंकेचा खेळ खल्लास, फक्त...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयासह यंदाच्या हंगामातील चौथ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेटच्या संघाने ८ गुण आपल्या खात्यात जमा करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ते अगदी सेमीच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघासाठी सेमीचा प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. कारण उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी श्रीलंकेचा संघ फक्त ६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. या गुणांवर सेमीचं समीकरण जुळणं येणं शक्यच होणार नाही. त्यामुळे त्यांचा स्पर्धेतील खेळ जवळपास खल्लास झाल्यात जमा आहे.
आफ्रिकेच्या ताफ्यातून गोलंदाजीत म्लाबा अन् मासाबाटा यांचा जलवा
पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या ताफ्यातून सलामीची बॅटर विशमी हिने दुखापतीतून सावरत मैदानात उतरुन ३३ चेंडूत केलेल्या ३४ धावा वगळता अन्य एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजी वेळी आफ्रिकेच्या ताफ्यातील नॉनकुलुलेको म्लाबा हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मासाबाटा क्लास हिने २ तर नेडीन डि क्लर्क हिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.