बंगळुरू : पहिल्या डावातील ३३८ धावांची मजबूत आघाडी घेणाऱ्या भारत अ संघाने आज येथे मोहम्मद सिराज याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
भारत अ संघाने त्यांचा पहिला डाव ८ बाद ५८४ धावांवर घोषित केला. पहिल्या डावात २४६ धावा फटकावणाºया दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी ४ बाद ९९ केल्या असून डावाने पराभव टाळण्यासाठी ते संघर्ष करीत आहेत. त्यांना अद्याप २३९ धावांची गरज आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसºया डावातील चारही विकेटस् वेगवान गोलंदाज सिराज याने घेतल्या. सिराजने आतापर्यंत १0 षटकांत १८ धावा देत ४ बळी घेतले आहेत. नवदीप सैनी याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर दबाव ठेवला आणि दहा षटकांत फक्त ९ धावा दिल्या; परंतु त्याला यश मिळाले नाही.
सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेटस् धावफलकावर अवघ्या ६ धावा असताना काढल्या होत्या. त्यानंतर जुबैर हमजा (नाबाद ४६) आणि एस. मुथुसामी (४१) यांनी चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी करीत पडझड थांबवली. आजचा खेळ थांबला तेव्हा हमजासोबत रुडी सेकेंड ४ धावांवर खेळत होता.
तत्पूर्वी, भारत अ संघाने आज सकाळी २ बाद ४११ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. त्यांनी पहिल्याच षटकांत मयंक अग्रवाल (२२0) याची विकेट गमावली. त्याला ब्यूरान हेंड्रिक्स (९८ धावांत ३ बळी) याने पायचीत केले. मयंक कालच्या धावसंख्येत भर टाकू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर २४ धावांवर बाद झाला. हनुमा विहारी (५४) आणि केएस भारत (६४) यांनी पाचव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल ३३ धावांवर नाबाद राहिला. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका अ (पहिला डाव) : सर्वबाद २४६ धावा.
भारत अ (पहिला डाव) : १२९.४ षटकात ८ बाद ५८४ धावा (मयांक अग्रवाल २२०, पृथ्वी शॉ १३६, श्रीकांत भरत ६४, हनुमा विहारी ५४; ब्युरन हेंड्रिक्स ३/९८, डुआने ओलिविर २/८८, डेन पिएड २/९२).
दक्षिण आफ्रिका अ (दुसरा डाव) : ४० षटकात ४ बाद ९९ धावा (झुबैर हमजा खेळत आहे ४६, सेन्युरन मुथुसामी खेळत आहे ४१; मोहम्मद सिराज ४/१८)