- एबी डिव्हिलियर्स लिहितो...
बंगळुरूमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आमच्या लढतीत ज्यावेळी एलेक्स हेल्सने मिड विकेटच्यावरून वेगवान व मोठा फटका लगावला त्या वेळी माझ्या डोक्यात एकच विचार आला की, प्रयत्न करीत संधी निर्माण करावी. झेल टिपण्याचा विचार करण्यापूर्वी मला वेगाने पळावे लागणार होते. कारण त्यामुळे चेंडूपर्यंत हात पोहचवता आला असता.
त्यामुळे मी शक्य तेवढ्या वेगाने पळालो आणि आपली नजर चेंडूवर कायम ठेवली. पण, चेंडू अधिक उंचावरून होता त्यामुळे त्यापेक्षा वेगळे करण्याची गरज होती. त्या वेळी केवळ एक सूर मारण्याची गरज होती. त्यामुळे मी स्वत:चा वेग कमी केला आणि शक्य तेवढा माझा हात उंचावला. मी झेप घेतली आणि चेंडू माझ्या हातात आला. अर्धे काम झाले होते. ज्यावेळी मी जमिनीवर पडलो त्या वेळी चेंडू माझ्या बोटातून निसटत होता. त्यामुळे मी पोटाचा आधार घेत चेंडू निसटणार नाही, याची खबरदारी घेतली. त्यानंतर मला कारकिर्दीतील सर्वांत समाधानकारक झेलपैकी एक झेल टिपल्याचे समाधान मिळाले. हेल्स बाद झाल्यानंतर विलियम्सनने धावांचा वेग कायम राखला, पण हैदराबादच्या संघाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. अशा पद्धतीने आम्ही विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आपल्या चाहत्यांदरम्यान आमच्यासाठी ही रात्र विशेष होती. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही १७०-१८० धावा पुरेशा ठरतील असा विचार केला होता. पण, सामनावीर मोईन अलीने शानदार खेळी केल्यामुळे माझ्यावरील दडपण कमी झाले. त्यानंतर कोलिन डी ग्रांडहोमने १७ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्यामुळे आम्हाला २१८ धावांची मजल मारता आली. दुसऱ्या डावात बाह्य मैदानावर दवाचा प्रभाव पडत असल्यामुळे आम्हाला २०० च्या जवळपास धावसंख्या उभारणे आवश्यक होते.
यजुवेंद्र चहलने पुन्हा एकदा शानदार मारा केला आणि टीम साऊदी व मोहम्मद सिराजने डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली. हा एक शानदार विजय होता. आता आम्हाला आगेकूच करण्यासाठी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल. त्यामुळे आम्हाला विजेतेपदाचे स्वप्न कायम राखता येईल.
(टीसीएम)