Join us  

...म्हणून धोनीने पथिरानासाठी पंचांना गुंतवून ठेवले; हुज्जत घालून चार मिनिटे रोखला खेळ

पेनल्टीचा धोका पत्करत जिंकला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 6:04 AM

Open in App

चेन्नई : चतुराईने नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी आपल्या अद्वितीय डावपेचांसाठी आणि मैदानावरील धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ओळखला जातो. आयपीएल २०२३ च्या पहिल्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध मंगळवारी त्याने आपले हेच कौशल्य दाखवून देताना चक्क पंचांनाच चार मिनिटे गुंतवून ठेवले होते.

१७३ धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातच्या डावातील १५ षटके संपली होती.  त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार धोनीने १६ वे षटक टाकण्यासाठी  मथिसा पथिरानाकडे चेंडू सोपविला. पथिराना चेंडू टाकण्यास सज्ज होण्याआधीच पंचाने त्याला रोखले. कारण, गोलंदाजी करण्याआधी तो मैदानात नव्हता, पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी पुरेसा वेळ घालवावा लागेल, हा नियम पंच समजावून सांगत होते. आयसीसीच्या नियमानुसार एखादा क्षेत्ररक्षक जितका वेळ मैदानाबाहेर असेल आणि परत आल्यानंतर त्याला तितका वेळ गोलंदाजी करण्याची परवानगी नसते. पथिराना चार मिनिटे बाहेर होता. त्यामुळे धोनी तितका वेळ त्याच्याकडून गोलंदाजी करून घेऊ शकत नव्हता. धोनी अन्य गोलंदाजाकडेही चेंडू सोपवू शकत होता, मात्र त्याने तसे केले नाही. शक्कल लढवीत त्याने पंचासोबत हुज्जत घातली. यामुळे चार मिनिटे खेळ थांबला. पण, खेळ सुरू झाल्यानंतर पथिराना गोलंदाजी करण्यास पात्र ठरला होता.

सीएसकेवर लागली पेनल्टीयाच कारणांमुळे सीएसकेवर पेनल्टी लावण्यात आली. नियमानुसार २० षटकांसाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागत असेल, तर जितकी षटके शिल्लक असतील तितक्या खेळादरम्यान ३० यार्डच्या बाहेर केवळ चारच क्षेत्ररक्षक उभे करता येतात. निर्धारित वेळेत सीएसकेने १८ षटके टाकली होती. यामुळे पेनल्टी लावण्यात आली. त्यानुसार ३० यार्डबाहेर त्यांचे चार खेळाडू उभे होते. पेनल्टी लागली नसती, तर ३० यार्डाबाहेर पाच क्षेत्ररक्षक उभे राहू शकले असते.

का पत्करला धोका ! धोनी इम्पॅक्ट जाणवला?     पथिराना सीएसकेचा ‘डेथ ओव्हर तज्ज्ञ’ गोलंदाज मानला जातो. धोनी त्याच्याकडून १६ वे, १८ वे आणि २० वे षटक टाकून घेऊ इच्छित होता.      १६ वे षटक पथिरानाने टाकले नसते, तर अखेरच्या पाच पैकी दोनच षटके त्याला टाकता आली असती. यापासून बचाव म्हणून आणि संघाला फायनल गाठून देण्यासाठी धोनीने चार मिनिटे खेळ रोखला, शिवाय पेनल्टी स्वीकारण्याचा धोका पत्करला. त्याने १६ वे, १८ वे आणि २० वे षटक पथिरानाकडूनच टाकून घेतले.      चेन्नईचा विजय १५ धावांनी साकार झाला. या अर्थाने धोनीने पत्करलेला धोका  सीएसकेच्या पथ्यावर पडली.      हा सर्व प्रकार सुरू असताना सामना संपल्यानंतर धोनीने याबद्दल खेद व्यक्त करावा, असे मत समालोचक सायमन डुल यांनी  व्यक्त केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App