Join us  

Womens T20 Challenge Final : स्मृती मानधानाच्या ट्रेलब्लॅझर्स संघानं पटकावलं जेतेपद, सुपरनोव्हाची हुकली हॅटट्रिक 

सुपरनोव्हानं 2018 व 2019मध्ये जेतपद पटकावले होते. यंदा त्यांना जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी होती.

By स्वदेश घाणेकर | Published: November 09, 2020 11:02 PM

Open in App

महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गतविजेत्या सुपरनोव्हा संघानं जबरदस्त कमबॅक केले. स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं सुरूवात तर दमदार केली, परंतु राधा यादवनं पूर्ण डावच पलटवला. राधानं आजच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. पण, ट्रेलब्लॅझर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना प्रथमच जेतेपद पटकावलं. स्मृती मानधानाच्या संघानं यंदाच्या महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेत बाजी मारली. 

हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी पाठवून ट्रेलब्लॅझर्सला पहिला धक्का दिला. पण, मानधाना दुसऱ्या बाजूनं दमदार फटकेबाजी करताना दिसली. तिनं 49 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 68 धावा केल्या. 14.5 षटकात ट्रेलब्लॅझर्सला 101 धावांवर दुसरा धक्का बसला. शशिकला सिरीवर्देनेनं मानधानाला बाद केले.मानधानाच्या विकेटनंतर सुपरनोव्हानं सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. राधा यादवनं ( Radha Yadav) ट्रेलब्लॅझर्सच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. 17 धावांत ट्रेलब्लॅझर्सचे 7 फलंदाज माघारी परतले. राधानं 4 षटकांत 16 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. महिला ट्वेंटी-20 चॅलेंजमध्ये पाच विकेट्स घेणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली. ट्रेलब्लॅझर्सला 8 बाद 118 धावांवर समाधान मानावे लागले.  

हरमनप्रीत कौरचा संघ हे लक्ष्य सहज पार करेल असेच वाटत होते. पण, ट्रेलब्लॅझर्सच्या गोलंदाजांनी लयबद्ध गोलंदाजी करताना सुपरनोव्हाच्या धावांवर लगाम लावला. कर्णधार हरमनप्रीत वगळता अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्यानं सुपरनोव्हाला जेतेपद कायम राखण्यात अपयश आलं. ट्रेलब्लॅझर्सच्या नट्टकन चंथम ( Nattakan Chantham ) हीनं सुरेख क्षेत्ररक्षण करताना संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. हरमनप्रीतला दुखापत झाल्याचा फटकाही सुपरनोव्हाला बसला. सलमा खातूननं 19व्या षटकात हरमनप्रीतला 30 धावांवर त्रिफळाचीत केलं. सलमानं 4 षटकांत 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या. सुपरनोव्हाला 7 बाद 102 धावाच करता आल्या. 

टॅग्स :IPL 2020महिला टी-२० क्रिकेट