सिडनी/नवी दिल्ली : चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर वर्षभराची बंदी लागली. त्याला कर्णधारपदही गमवावे लागले. या कृत्याचा पश्चात्ताप झालेल्या स्मिथने पत्रकारांपुढे अश्रू गाळल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती वाढत आहे. दिग्गज खेळाडूंसोबत प्रसारमाध्यमंदेखील त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवित आहे.
भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने स्मिथ आणि वॉर्नर यांच्याबाबत सहानुभूती दाखवित लोकं तुम्हाला रडायला भाग पाडतात. तुम्ही रडलात की ते आनंदी होतात, अशी टीका करीत आॅस्ट्रेलियाचे खेळाडू या प्रकरणातून लवकरच सावरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अश्विनने टिष्ट्वट केले,‘लोकं तुम्हाला रडवून आनंदी होतात. तुम्ही पुन्हा यातून ताकदीनिशी बाहेर पडायला हवे. इतरही खेळाडूंचा तुम्हाला पाठिंबा लाभेल, अशी आशा आहे.’
आॅस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनीही स्मिथ या प्रकरणातून लवकर सावरेल अशी अपेक्षा व्यक्त केली पण डेव्हिड वॉर्नर याच्याबाबत काही बोलू शकत नसल्याचे वक्तव्य केले आहे. पाक संघाचे प्रशिक्षक असलेले आर्थर यांनी विश्व क्रिकेटमधील खेळाडूंची वागणूक असहिष्णू होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले,‘स्मिथच्या रोमारोमात क्रिकेट भिनले असून तो चांगला खेळाडू आणि कर्णधार आहे. माझ्यामते तो पुनरागमन करेल, त्याचे धडक्यात पुनरागमन होईल, असा मला विश्वास आहे. वॉर्नरबाबत मात्र काही सांगू शकत नाही.’
एका ब्रिटिश वृत्तपत्राने स्मिथच्या रडण्यावर लिहिले,‘ प्रिय आॅस्ट्रेलिया आता खूप झाले. ही चेंडूसोबत छेडछाड होती, हत्या नव्हे...’आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने एका वृत्तपत्रामध्ये लिहिले,‘असे आधी बघितले नसल्याने आम्ही सर्वजण रागात होतो. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे देखील सुचेनासे झाले आहे. खेळाडूंनी जो गुन्हा केला त्यापेक्षा अधिक पटीने टीका होत आहे.’ (वृत्तसंस्था)