भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने दीर्घकाळानंतर मैदानात परतला. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध खेळताना हार्दिक गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या ४२ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली, ज्यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. या कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री केली.
हार्दिक पंड्याने पंजाबविरुद्ध पहिला षटकार मारून टी२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठला. टी२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा आठवा भारतीय फलंदाज ठरला. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, एमएस धोनी, केएल राहुल आणि सुरेश रैना यांनी टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करून दाखवली आहे. शिवाय, हार्दिक टी२० क्रिकेटमध्ये शतक न करता ३०० षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनी हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने टी२० क्रिकेटमध्ये शतक न मारता ३५० षटकार मारले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज
| क्रमांक | फलंदाज | षटकार |
| १ | रोहित शर्मा | ५४७ |
| २ | विराट कोहली | ४३५ |
| ३ | सूर्यकुमार यादव | ३९४ |
| ४ | संजू सॅमसन | ३६४ |
| ५ | एमएस धोनी | ३५० |
| ६ | केएल राहुल | ३३२ |
| ७ | सुरेश रैना | ३२५ |
| ८ | हार्दिक पंड्या | ३०३ |
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
अभिषेक शर्माच्या अर्धशतकामुळे पंजाबने २० षटकांत ८ विकेट्स गमावून २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याने हार्दिकच्या शानदार खेळीमुळे १९.१ षटकांत ३ विकेट्स गमावून २२३ धावांचे लक्ष्य गाठले. हार्दिकला त्याच्या सामना जिंकणाऱ्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूचे फॉर्ममध्ये परतणे ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. निवडकर्ते त्याच्या फिटनेस आणि कामगिरीवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.