SL vs ENG, 1st Test Day 3 : इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) दमदार खेळ करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर गुंडाळून मैदानावर उतरलेल्या इंग्लंडनं ४२१ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडनं पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी घेतली आणि त्यांच्या या आघाडीत जो रूटचा सिंहाचा वाटा आहे. रूटनं द्विशतकी खेळी करताना मोठा विक्रम नावावर केला.
डॉन बेस ( ५-३०) आणि स्टुअर्ट ब्रॉड ( ३-२०) यांनी श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात जो रूटनं ३२१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार खेचून २२८ धावा केल्या. कसोटीतील त्याचे हे चौथे द्विशतक आहे आणि दोन द्विशतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी त्यानं २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२६ धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं कर्णधार म्हणून कसोटीत सात द्विशतकं झळकावली आहेत.
जॉनी बेअरस्टो ( ४७), डॅन लॉरेन्स ( ७३), जोस बटलर ( ३०) यांनी रुटला चांगली साथ दिली. रुटनं कसोटीत ८००० धावांचा पल्लाही ओलांडला.