Join us

वो 'सिकंदर' ही दोस्तों कहलाता है!... पाकिस्तान एअरफोर्समध्ये व्हायचं होतं पायलट, झाला क्रिकेटर अन् झिम्बाब्वेला केलं 'एअरलिफ्ट'

मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा झिम्बाब्वेने रोमहर्षक लढतीत तगड्या पाकिस्तानला पराभूत केले तेव्हा या नावाची प्रथम चर्चा रंगली.

By स्वदेश घाणेकर | Updated: June 30, 2023 12:01 IST

Open in App

- स्वदेश घाणेकर

झिम्बाब्वेने शेवटचा वन डे वर्ल्ड कप कधी खेळला असेल हे तुम्हाला आठवतंय का? त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील किती नावं तुम्हाला माहित्येयत? अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, हॅमिल्टन मसाकाड्झा, हेन्री ओलोंगा, हिथ स्ट्रीक, ब्रेंडन टेलर अन् ततेंदा तैबू ही नावं सोडली तर आणखी कोणा खेळाडूचं नाव आपण सांगूही शकत नाही... पण, आज झिम्बाब्वेने वेगळी उंची गाठलेली पाहायला मिळतेय आणि एक नाव जे सर्वांच्या मुखी आहे, ते म्हणजे सिकंदर रझा... मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा झिम्बाब्वेने रोमहर्षक लढतीत तगड्या पाकिस्तानला पराभूत केले तेव्हा या नावाची प्रथम चर्चा रंगली. त्यानंतर त्याला आयपीएलचा करार मिळाला अन् तेथेही त्याने धमाल करून दाखवली.. पण, पाकिस्तानात जन्मलेल्या या खेळाडूचे स्वप्न काही और होते आणि ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसतंय...

२०१५ मध्ये झिम्बाब्वे शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा खेळला अन् त्यातही तो १४ संघांमध्ये ११ व्या स्थानावर राहिला. १९९९ व २००३ मध्ये सुपर सिक्समधील मजल ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण, भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेने सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या झिम्बाब्वेत वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा सुरू आहे आणि मुख्य स्पर्धेतील उर्वरित दोन जागांसाठी १० संघ लढत आहेत. पण, यात झिम्बाब्वेने माजी विजेत्या श्रीलंका व वेस्ट इंडिज यांच्यावर कुरघोडी करून अव्वल स्थान पटकावले आहे. आता एक विजय अन् ते भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत... झिम्बाब्वेच्या या अविश्वसनीय वाटचालीचे श्रेय कर्णधार क्रेग एर्व्हिन आणि सीन विलियम्स या पस्तीशी ओलांडलेल्या अनुभवी जोडीसोबतच ३७ वर्षीय सिकंदर रझाला द्यायला हवं..

२०२३ हे वर्ष वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि त्यादृष्टीने झिम्बाब्वेने मोर्चेबांधणी केली...  २०२३ मध्ये झालेल्या १२ पैकी ९ वन डे सामन्यांत झिम्बाब्वेने बाजी मारली आणि मार्चपासून तर त्यांनी सलग सात विजयांची नोंद करून स्वतःच्याच आधीच्या विक्रमाशी बरोबरी केली. २०१३ मध्ये झिम्बाब्वेच्या संघात दाखल झालेल्या सिकंदरने तर या दहा वर्षांत संघावर स्वतःचाच ठसा उमटवलाय... झिम्बाब्वेकडून सर्वात जलद ४००० धावा करणारा तो फलंदाज बनला आहे. सातत्य हेच शस्त्र घेऊन तो झिम्बाब्वेच्या वाटेत येणारा प्रत्येक प्रतिस्पर्धी तो उडवून लावतोय... फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही त्याने प्रभाव पाडला आहे...

हा सिकंदर आला कुठून ?

पाकिस्तानातील सिआलकोट भागात काश्मीरी कुटुंबातील १९८६ सालचा सिकंदरचा जन्म... पाकिस्तान वायू दल पब्लिक स्कूलमध्ये तो तीन वर्ष शिकला. त्यालाही पाकिस्तानच्या वायू दलात पायलट व्हायचे होते. त्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, परंतु ६० जणांचीच निवड झाली अन् त्यात सिकंदर होता. पण, पाकिस्तानी वायू दलासाठीच्या परीक्षेत तो नापास झाला अन् त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, तो खचला नाही.. २००२ मध्ये तो कुटुंबीयांसोबत झिम्बाब्वेत स्थायिक झाला. त्यानंतर तो स्कॉटलंडला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करण्यासाठी गेला. तेथेच त्याने क्रिकेटला सुरुवात केली आणि त्याला त्याची खरी ओळख पटली. 

२००९ पासून त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरूवात केली आणि Mashonaland Eagles हा त्याचा पहिला संघ होता. १२ एप्रिल २००७मध्ये त्याने लॉगन चषक स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये हवा केलीच होती आणि २०११ मध्ये निवड समिती सदस्यांची नजर त्याच्यावर पडली. पण, झिम्बाब्वेच्या नागरिकत्वाच्या मुद्यामुळे त्याची दोन वर्ष वाया गेली. २०१३ मध्ये त्याने झिम्बाब्वेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले अन् आज तो तेथील सुपरस्टार आहे...

झिम्बाब्वेने २०१७मध्ये श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय मिळवला अन् त्यात सिकंदरने सिंहाचा वाटा उचलला होता. झिम्बाब्वेने घराबाहेर प्रथमच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम तेव्हाच केला. याच सिकंदरने आता झिम्बाब्वेच्या प्रत्येक नागरिकाला वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न दाखवले आहे. ८ वर्षानंतर झिम्बाब्वेचा संघ वन डे वर्ल्ड कप खेळणार आहे आणि कोण जाणो भारतात होणाऱ्या या स्पर्धेत झिम्बाब्वे धक्कादायक निकालही नोंदवू शकतो... पात्रता स्पर्धेत त्यांनी वेस्ट इंडिजसारख्या माजी विजेत्यांना पाणी पाजलेय... आज स्टेडियम खचाखच भरलेलं दिसतंय ते सिकंदरची अष्टपैलू कामगिरी पाहण्यासाठीच आणि इथून झिम्बाब्वे क्रिकेटही भरारी घेईल अशी आशा सर्वांनाच आहे. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपझिम्बाब्वे
Open in App