Join us  

‘तो विजयाचा नायक बनू शकला असता; पण...’; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयसने व्यक्त केल्या भावना

लखनौविरुद्ध बुधवारी १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याने पराभवानंतरही कौतुक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 9:09 AM

Open in App

नवी मुंबई : लखनौविरुद्ध बुधवारी १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याने पराभवानंतरही कौतुक केले. पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या.

अय्यर म्हणाला, ‘मला अजिबात दुःख  नाही. मी खेळलेल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता. रिंकूने ज्या पद्धतीने आम्हाला शेवटपर्यंत नेले ते मला खूप आवडले; पण दुर्दैवाने योग्य वेळेवर चेंडू खेळू शकला नाही, तो खूप दुःखी होता. तो  सामना जिंकून देईल आणि हिरो होईल, असे वाटत होते; पण त्याने  उत्तम खेळी खेळली. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.’ अंतिम एकादशमध्ये वारंवार बदल करणारा केकेआरचा कर्णधार म्हणाला, ‘आमच्यासाठी हे पर्व खडतर होते.  गली सुरुवात केली; पण सलग पाच सामने गमावले आणि मला वैयक्तिक वाटते की आम्ही खूप बदल केले आहेत. आम्हाला फॉर्ममुळे हे करावे लागले. त्यामुळे आम्हाला रिंकूसारख्या खेळाडूची ओळख झाली.’

रिंकूला बाद करणारा चेंडू नो बॉल?

लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बुधवारी झालेला सामना हा यंदाच्या आयपीएलमधला सर्वात रोमांचक सामना ठरला. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करून विजयाचा घास केकेआरच्या तोंडापर्यंत नेला होता, परंतु एव्हिन लुईसच्या अफलातून झेलने तो हिरावला गेला. पण स्टॉयनिसने टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्याचा दावा आता चाहते करत आहेत. २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एका हाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. परंतु तो चेंडू टाकताना स्टोईनिसचा पाय नियंत्रण रेषेबाहेर जात असल्याचा व्हिडियो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

रिंकूवर लक्ष असेल

केकेआरचे कोच ब्रेंडन मॅक्युलम म्हणाले, ‘रिंकू या पर्वात आमच्या संघासाठी नवा शोध ठरला. तो असा खेळाडू आहे, ज्याच्यावर केकेआर आगामी काही वर्षांत सतत लक्ष केंद्रित करेल.  आम्ही त्याला प्रगती करताना पाहू इच्छितो.’

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App