Join us

श्री माँ विद्यालयाने पटकावला श्री घंटाळी देवी चषक

अद्विक मंडलिक ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 6, 2023 16:09 IST

Open in App

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या श्री घंटाळी देवी चषक क्रिकेट स्पर्धेमधील अंतिम सामन्यात श्री माँ विद्यालय संघ विजयी झाला. श्री माँ विद्यालय आणि वसंतविहार स्कूल या दोन संघांदरम्यान झालेल्या सामन्यात श्री माँ विद्यालयाने हा सामना ७० धावांनी जिंकला.

घंटाळी प्रबोधिनी संस्था व सोविनेर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री घंटाळी देवी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ जानेवारीला या स्पर्धेला सुरूवात झाली होती आणि सर्व सामने ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर खेळवण्यात आले. ठाणे महानगरपालिका हद्दीतील एकूण १७ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम सामना श्री माँ विद्यालय आणि वसंत विहार स्कूल यांच्यात झाला. श्री माँ विद्यालयाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने ४४.५ षटकांमध्ये सर्व गडी बाद १७० धावा केल्या. यात अथर्व गावडे ४६ आणि कामेश जाधव याने ३५ धावा केल्या.

श्री माँ विद्यालयाच्या या धावसंख्येस प्रत्युत्तर देताना वसंत विहार स्कूल संघाने ३१.५ षटकांत सर्व गडी बाद फक्त १०० धावा केल्या. श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिक याने ५ गडी बाद केले, त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पार्थ देशमुख यानेही ३ गडी बाद केले.

तसेच या स्पर्धेत कामेश जाधव - उत्कृष्ट फलंदाज, दक्ष पिल्ले - उत्कृष्ट गोलंदाज, रुगवेद जाधव - उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश मढवी, किशोर ओवळेकर, अतुल फणसे, मयूर कद्रेकर, भाऊराव जगताप, राजन केणी, विलास मोरेकर, मराठे, घंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर समन्वयक भारत शर्मा व या स्पर्धेचे सामना समन्वयक सागर जोशी व नम्रता ओवळेकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :ठाणे
Open in App