ग्रोस आयलेट : ऑफ स्पिनर दीप्ती शर्माच्या अचूक माऱ्यानंतर युवा शेफाली वर्माच्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी येथे दुस-या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा १० बळींनी धुव्वा उडवला.
१५ वर्षांच्या शेफालीने चमकदार कामगिरी कायम राखताना ३५ चेंडूमध्ये नाबाद ६९ धावा केल्या. त्यात १० चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. दुसरी सलामीवीर स्मृती मानधना ३० धावा काढून नाबाद राहिली. भारताने १०.३ षटकांत गडी न गमाविता १०४ धावा फटकावत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
त्याआधी, दीप्तीने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत वेस्ट इंडिजचा डाव ७ बाद १०३ धावांत रोखला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखा पांडेने स्टॅसी एन किंग (७) हिला बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. यष्टिरक्षक फलंदाज शेमाइन कॅम्पबेल (०) हिला खातेही उघडता आले नाही. तिला फिरकीपटू राधा यादवने बाद केले.
सलामीवीर हॅली मॅथ्यूज (२३) व चेडीन नेशन्स (३२) यांनी विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना केवळ ३२ धावांची भागीदारी करता आली. पूजा वस्त्राकारने मॅथ्यूजला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर दीप्तीने वर्चस्व गाजवले. तिने अखेरच्या चार षटकांत चार बळी घेतले. नताशा मॅकलीन (१७) दुहेरी धावसंख्या नोंदविणारा विंडीजची तिसरी फलंदाज ठरली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत लहान वयात अर्धशतक ठोकण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणाºया शेफालीने आपला शानदार फॉर्म कायम राखला. शेफालीसोबत मानधनाने केवळ सहायकाची भूमिका बजावली. तिच्या २८ चेंडूंच्या खेळीत चार चौकारांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार अनिसा मोहम्मदने सात गोलंदाजांचा वापर केला, पण त्याचा भारताच्या सलामीच्या जोडीवर कुठलाही परिणाम झाला नाही. तिसरा टी२० सामना गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये १४ नोव्हेंबरला खेळला जाईल. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज (महिला) : २० षटकात ७ बाद १०३ धावा (चेडीन नेशन ३२, हायली मॅथ्यूज २३, नताशा मॅकलीन १७; दीप्ती शर्मा ४/१०.) पराभूत वि. भारत (महिला) : १०.३ षटकात बिनबाद १०४ धावा (शेफाली वर्मा नाबाद ६९, स्मृती मानधना नाबाद ३०.)
भारताची अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना विंडीजविरुद्ध आक्रमक फटका मारताना. युवा शेफालीच्या धडाकेबाज खेळीपुढे या सामन्यात स्मृती क्वचितच आक्रमक पवित्र्यात दिसली. या दोघींनी यजमानांची गोलंदाजी फोडून काढली.