नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थितीतून जात असणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आज यो-यो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर निवड समिती सदस्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध १४ जूनपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी दिल्लीचा युवा गोलंदाज नवदीप सैनी याचा संघात समावेश केला आहे.
सैनी सध्या देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील तेजतर्रार गोलंदाजी करणाºयांपैकी एक असून, त्याने पहिल्या दोन हंगामात रणजी ट्रॉफीत प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतर त्याला भविष्यातील गोलंदाजांपैकी एक म्हणून गणले जात आहे. सैनीची चारदिवसीय सामन्यांसाठी पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणाºया भारतीय अ संघातही निवड झाली आहे. या २५ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत ३१ प्रथमश्रेणी सामन्यांत ९६ गडी बाद केले आहेत. बीसीसीआयने म्हटले, ‘‘अखिल भारतीय सिनिअर निवड समितीने नवदीप सैनी याचा अफगाणिस्तानविरुद्ध आगामी कसोटीसाठी मोहंमद शमीचा पर्याय म्हणून भारतीय कसोटी संघात समावेश केला आहे. बंगळुरू येथे एनसीएत मोहंमद शमी फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.’’ भारतीय संघाच्या फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करण्यासाठी यो-यो टेस्ट मानक ठरवण्यात आले आहे. या टेस्टमध्ये खेळाडूंची क्षमता आणि फिटनेसचे विश्लेषण केले जाते. भारताच्या सिनिअर अ संघासाठी सध्याचे मानक १६.१ हे आहे. करुण नायर आणि हार्दिक पांड्या हे यो-यो टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू असून, ज्यांचा स्कोअर १८ पेक्षा जास्त आहे. (वृत्तसंस्था)