दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये बांगलादेशच्या शाकिब अल हसन याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाला स्थान मिळवता आलेले नाही. त्याचवेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी मात्र अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी क्रमवारीतील आपापले अव्वल स्थान कायम राखले आहे.
नुकत्याच झालेल्या आयर्लंड व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकेतील कामगिरीचा शाकिबला फायदा झाला. शाकिबने या मालिकेत दोन नाबाद अर्धशतके व दोन बळी घेतले होते. शाकिबचे ३५९ गुण असून अफगाणिस्तानचा राशिद खान दुसऱ्या स्थानी आहे. राशिदचाच सहकारी मोहम्मद नबी तिसºया क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंमध्ये केदार जाधव सयुंक्तरित्या १२ व्या स्थानी आहे. त्याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा एंडिले फेहलुकवायो व इंग्लंडचा मोईन अली हेही १२ व्या क्रमांकावर आहेत. आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणारा हार्दिक पांड्या २० व्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांमध्ये बुमराहने सर्वाधिक ७७४ गुणांसह वर्चस्व राखले आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा टेÑंट बोल्ट (७५९) आणि अफगाणिस्तानच्या राशिद खान (७२६) यांनी अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानी कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे भारताच्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान मिळवले आहे. (वृत्तसंस्था)
फलंदाजीत कोहलीचे वर्चस्व कायम
फलंदाजीत मात्र कोहलीने आपले वर्चस्व कायम राखले असून तो सर्वाधिक ८९० गुणांसह अव्वल स्थानी आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने ८३९ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले असून न्यूझीलंडचा रॉस टेलर (८३१) आणि वेस्ट इंडिजचा शाय होप (८०८) अनुक्रमे तिसºया व चौथ्या स्थानी आहेत. होपने यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकला मागे टाकून चौथे स्थान मिळवले. डीकॉक ८०३ गुणांसह पाचव्या स्थानी घसरला आहे.