Join us  

अमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी

बांगलादेशमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची 48 रुग्ण आढळली आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून बांगलादेशमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:32 AM

Open in App

बांगलादेशमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची 48 रुग्ण आढळली आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून बांगलादेशमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांसाठी बांगलादेशचे क्रिकेटपटू पुढे आले आहेत. बांगलादेशच्या 27 खेळाडूंनी त्यांचा निम्मा पगार बांगलादेश सरकारला देऊ केला आहे. मशरफे मोर्ताझानेही बांगलादेशमधील 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी घेत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. पण, बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व करणारा, परंतु अमेरिकेत स्थायिक असलेल्या अष्टपैलू शकिब अल हसनही बांगलादेश सरकारच्या मदतीला धावला आहे.

जगातील अव्वल अष्टपैलू क्रिकेटपटू अमेरिकेत एका हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी आयसोलेट झाला आहे. त्याचे कुटुंबीय अमेरिकेत आहेत, परंतु शकिब एका हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यामुळे एकाच देशात असूनही कुटुंबीयांना भेटता येत नसल्याचे दुःख त्यानं काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं.  33 वर्षीय शकिबनं बांगलादेशमधील गरीब कुटुंबीयांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शकिब अल हसन फाऊंडेशननं 'Save Bangladesh' ही मोहीम सुरू केली आहे. शकिबनं फेसबुकवरून ही माहिती दिली.ही फाऊंडेशन आतापर्यंत 200 कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी 2000 कुटुबांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. या समाजकार्यासाठी ते जगभरातून निधीही गोळा करत आहेत. ''कोरोना व्हायरसपासून बांगलादेशचं रक्षण करणं, हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. या काळात अनेक गरीब कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहेत. अशा 2000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा आमचा निश्चय आहे आणि ही संख्या अजूनही वाढू शकते,'' असे शकिबनं त्याच्या फेसबुक पोस्टवर लिहीले आहे. बांगलादेशच्या अनेक क्रिकटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात मशरफे मोर्ताझा, रुबेल होसैन, लिटन दास आणि मोसाडेक होसैन यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल.  

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याबांगलादेश