Join us  

शाहिद आफ्रिदीनं कोहलीला निवृत्तीचा सल्ला दिला, अमित मिश्रानं एका वाक्यात केली बोलती बंद!

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला योग्य वेळेवर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 1:02 PM

Open in App

नवी दिल्ली-

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला योग्य वेळेवर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं ज्या पद्धतीनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच पद्धतीनं मोठ्या सन्मानानं निवृत्तीचाही निर्णय घ्यावा, असं आफ्रिदीनं म्हटलं. करिअरच्या सर्वोत्तम शिखरावर असताना कोहलीनं निवृत्ती जाहीर करायला हवी असंही तो म्हणाला. 

"संघाकडून तुम्हाला ड्रॉप केलं जाईल अशी वेळ स्वत:वर येऊ देऊ नये. जेव्हा तुम्ही करिअरच्या सर्वोच्च स्थानावर असता तेव्हाच निवृत्ती घ्यायला हवी. अर्थात असं खूपच कमी पाहायला मिळतं. खूपच कमी खेळाडू असा निर्णय घेतात. पण विराट कोहली जेव्हा निवृत्तीचा निर्णय घेईल तेव्हा असं करणार नाही. ज्या धडाक्यात कोहलीनं करिअरची सुरुवात केली होती तसाच तो आपल्या करिअरचा शेवटही सर्वोत्तम कामगिरीवेळीच करेल", असं शाहिद आफ्रिदी यानं पाकिस्तानातील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

शाहिद आफ्रिदीच्या विधानाचा भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा यांनं चांगलाच समाचार घेतला आहे. अमित मिश्रानं ट्विट करत आफ्रिदीला सुनावलं. "प्रिय आफ्रिदी, काही लोक करिअरमधून एकदाच निवृत्ती घेतात. त्यामुळे कृपा करुन विराट कोहलीला या सर्व गोष्टींपासून दूर राहू द्यात", असा खोचक टोला अमित मिश्रानं आफ्रिदीला लगावला आहे. 

भारताच्या ट्वेन्टी-२० संघात कोहलीच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं होतं. कारण या वर्षाच्या सुरुवातीला कोहलीला ट्वेन्टी-२० मध्ये निराशाजनक सुरुवात केली होती. आयपीएलमध्ये कोहलीच्या धावांची सरासरी २५ पेक्षा कमी होती. तर या वर्षांच्या सुरुवातीला ४ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्यानं केवळ ८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर कोहलीनं काही काळ ब्रेक घेतला आणि भारताच्या वेस्ट इंडिज तसंच झिम्बाब्वे दौऱ्यात कोहलीला आराम देण्यात आला होता. 

आशिया चषकात केलं दमदार पुनरागमनकोहलीसाठी हाच ब्रेक खूप उपयोगी ठरल्याचं पाहायला मिळालं. कारण नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात कोहलीनं दमदार पुनरागमन केलं. भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडला तरी कोहलीच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या. कोहलीनं आपल्या करिअरमधील पहिलंवहिलं ट्वेन्टी-२० प्रकारात शतक साजरं केलं. पाच सामन्यांत कोहलीनं ९२ च्या सरासरीनं २७६ धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीनं नाबाद १२२ धावांची खेळी साकारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं कोहलीचं हे ७१ वं शतक ठरलं. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीविराट कोहली
Open in App