Join us  

आफ्रिदीचा हास्यास्पद दावा; श्रीलंकन खेळाडूंच्या माघार नाट्यामागे IPL मालकांचा डाव

ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 9:15 AM

Open in App

कोलंबो : ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंकन खेळाडूंच्या या निर्णयामागे भारताचा हात असल्याचा अजब दावा पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन यांनी केला होता. त्यांच्यासारखाच हास्यास्पद दावा पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनं केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) संघ मालकांच्या दबावामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी ही माघार घेतल्याचं, आफ्रिदीने म्हटले आहे.  

श्रीलंका क्रिकेट संघ 27 सप्टेंबरपासून तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मलिंगा व करुणारत्नेसह थिसारा परेरा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशॅन डिकवेला, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडिमल यांनीही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. मार्च 2009च्या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघ 2017मध्ये लाहोर येथे एक ट्वेंटी-20 सामना खेळला होता. आताच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेनंतर श्रीलंका येथे दोन कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेने 2015मध्ये पाकिस्तानात वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळले होते आणि वेस्ट इंडिजही 2018मध्ये तीन ट्वेंटी-20 सामने खेळले होते. 

श्रीलंकेच्या खेळाडूंना हा निर्णय घेण्यासाठी भारताकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा हुसैन यांनी केला. त्यांनी ट्विट केले की,'' एका समालोचकाने मला सांगितले की, भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर दबाव टाकला जात आहे. तुम्ही पाकिस्तानात खेळायला जात, तर तुम्हाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी धमकी लंकेच्या खेळाडूंना दिली जात आहे. हे पातळी सोडून वागणं आहे.'' 

फवाद यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवत आफ्रिदी म्हणाला,'' श्रीलंकेचे खेळाडू आयपीएल मालकांच्या दबावाखाली  आहेत. गेल्या वर्षी मी काही लंकन खेळाडूंशी बोललो होतो, तेव्हा त्यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळायचे आहे, परंतु आयपीएल मालक सांगतात की पाकिस्तानात खेळलात तर तुमचा करार रद्द करू.''   तो पुढे म्हणाला, पाकिस्तानींनी नेहमी श्रीलंकेला सहकार्य केले आहे. श्रीलंकन क्रिकेट मंडळाने त्यांच्या खेळाडूंना पाकिस्तानात खेळण्यासाठी दबाव आणायला हवा होता.'' प्रमुख खेळाडूंशिवाय श्रीलंका पाकिस्तानात जाणारएकदिवसीय संघ : लाहिरु थिरिमाने (कर्णधार), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना. 

टी20 संघ : दासुन शनाका (कप्तान), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना और भानुका राजपक्षा. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानश्रीलंका