Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेतृत्व बदलाचा आणखी एक प्रयोग करण्यात आला आहे. मोहम्मद रिझवान याला एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून त्याच्या जागी जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका वर्षांत तिसरा कर्णधार
गतवर्षी ऑक्टोबरमध्ये बाबर आझमनं नेतृत्व सोडल्यावर मोहम्मद रिझवान याच्याकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. आता रिझवानची जागा २५ वर्षीय जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं घेतली आहे. एका वर्षात पाकिस्तान संघात तिसऱ्यांदा नेतृत्व बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या बैठकीत नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पाकिस्तान संघाचे मर्यादित षटकांच्या सामन्यातील मुख्य प्रशिक्षक माइक हेसन हा देखील उपस्थितीत होता.
रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकचा ऑस्ट्रेलियातील दुष्काळ संपला
बाबर आझमची जागा घेतल्यावर मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने दमदार सुरुवात केली. नोव्हेंबर २०२४ मध्ये पाक संघाने ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका २-१ अशी जिंकली. रिझवान हा २२ वर्षांनी पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियन मैदानात मालिका जिंकून देणारा कर्णधार ठरला. त्यानंतर घरच्या मैदानात पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३-० अशी मात दिली. याशिवाय पाक संघाने झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिकाही २-१ अशी जिंकली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीत फजिती, वेस्ट इंडिजनंही जिरवली
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने २० पैकी ११ सामन्यात पराभवाचा सामना केला. दमदार सुरुवात केली. पण २०२५ मध्ये संघाची कामगिरी घसरली. घरच्या मैदानातील तिरंगी मालिकेत पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडनं पराभूत करत फायनल जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकच्या संघाला एकही सामना जिंकता आला नव्हता. साखळी फेरीतूनच बाद होण्याची वेळ आली. वेस्ट इंडीजच्या मैदानात पाकिस्तानच्या संघाला २-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. ३४ वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानवर ही वेळ आली.
गोलंदाजीशिवाय शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर आता कॅप्टन्सीचं ओझं
शाहीन शाह आफ्रीदी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून पहिल्यांदा पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. एकदिवसीय क्रिकेमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. तो पाकिस्तानच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. आतापर्यंत ६६ एकदिवसीय सामन्यात त्याने १३१ विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानची कॅप्टन्सी करताना तो आपल्या गोलंदाजीतील धार आणि कॅप्टन्सीची रुबाब मिरवण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.