Join us  

सचिनचा अखेरचा सामना पाहून 'ती' क्रिकेट खेळायला लागली आणि आता भारतीय संघात एंट्री केली

सचिन म्हणजे देव, सचिन म्हणजे आदर्श, सचिन म्हणजे प्रेरणास्थान... या साऱ्या गोष्टी मानत तिनंही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुहुर्त ठरला तो सचिनच्या अखेरच्या सामन्याचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:48 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणजे काही चाहत्यांसाठी दैवत. सचिन म्हणजे देव, सचिन म्हणजे आदर्श, सचिन म्हणजे प्रेरणास्थान... या साऱ्या गोष्टी मानत तिनंही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुहुर्त ठरला तो सचिनच्या अखेरच्या सामन्याचा. सचिनचा अखेरचा सामना तिने प्रेक्षकांमध्ये बसून पाहिला. त्यावेळी तिने क्रिकेट खेळायचा निर्धार केला आणि आता तर तिने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. ही गोष्ट आहे हरयाणातील शेफाली वर्माची.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर लाहिली येथे सचिन रणजी क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला होता. या सामन्याला वेगळेच वलय प्राप्त झाले होते. या सामन्यात सचिनला जो मान-सन्मान मिळाला, तो शेफालीने पाहिला आणि ती क्रिकेटकडे आकर्षित झाली.

शेफालीने पीटीआयशी बोलताना सांगितले की, " जेवढी लोकं सचिन यांना मैदानात बघण्यासाठी उभी होती, तेवढीच लोकं मैदानाबाहेरही होती. त्यावेळी मला समजले की भारतामध्ये क्रिकेटपटू म्हणून जन्माला येणे, ही किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी सचिन यांचा क्रिकेटमधील अखेरचा दिवस कधीही विसरू शकत नाही. माझ्या क्रिकेटच्या यात्रेला तिथूनच सुरुवात झाली."

शेफालीच्या वडिलांनाही क्रिकेटपटू व्हायचे होते. पण काही कारणास्तव त्यांनी क्रिकेटपटू होता आले नाही. त्यांनी आपले स्वप्न शेफालीमध्ये पाहिले. त्यामुळेच त्यांनी लहानपणापासून शेफालीली क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले. आता शेफालीचा पाच वर्षांचा भाऊदेखील क्रिकेटचे धडे गिरवतो आहे. शेफालने घेतलेली मेहनत फळली असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तिची संघात निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकर